50 मृत गायी उघड्यावर फेकल्या, गोरक्षण संस्थेचा प्रताप

50 मृत गायी उघड्यावर फेकल्या, गोरक्षण संस्थेचा प्रताप


चंद्रपूर : लोहारा-जुनोना जंगलात 50 मृत गायी फेकत विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वाघासह इतर जंगली जनावरे या मृत गायी खात असल्याने वन्यजीव अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे गायींना असलेले रोग वन्यजीवांना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामागे इतर कुणी नाही, तर चक्क गोरक्षण संस्थाचं असल्याचेही उघड झाले आहे. वाघांवर विषप्रयोग करण्यासाठी देखील गायींचा वापर होऊ शकतो असा धोका वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

चंद्रपूर शहराजवळ लोहारा या गावी उज्ज्वल गोरक्षण संस्थेची एक गोशाळा आहे. लोकांच्या देणगीवर ही संस्था गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करते. देशात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यावर चंद्रपूरसारख्या सीमावर्ती जिल्ह्यात मोठ्या संख्येत जनावरे तस्करीची प्रकरणे उजेडात येत आहेत. ही  सर्व जनावरे लोहार येथील संस्थेत पोहचवली जातात. नुकतीच राजुरा भागात सुमारे 200 गुरांची तस्करी पोलिसांनी पकडली. यातील 50 हून अधिक जनावरे मृत आढळली. या मृत गायींची विल्हेवाट लावताना संस्थेने गायींना थेट जुनोना जंगलातील तलाव भागात फेकून दिल्याचे बोलले जात आहे. संबंधित संस्थेने या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

‘मृत गायी टाकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंध’

लोहारा जंगलात या मृत गायी टाकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंध येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यांनी याची वनविभागाकडे तक्रारी केली. विशेष म्हणजे हा परिसर सध्या ‘वाघडोह मेल’ या नावाने परिचित आहे. तसेच येथे ताडोबा परिघातील सर्वात मोठ्या वाघाचे वास्तव्यस्थान आहे.

‘वाघ या मृत गायींवर ताव मारतानाचा व्हिडिओ वायरल’

दरम्यान, काही हौशी वन्यजीव नाईट सफारी करत असताना त्यांना एक मोठा वाघ या गायींवर ताव मारताना दिसला. हा व्हिडिओ वायरल झाल्यावर वन्यजीव अभ्यासकांनी या स्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. गोरक्षण संस्थेने सुमारे डझनभर मृत गायी या जागी फेकून विल्हेवाट लावल्याचे उघड झाले. संस्थेचा हा बेजबाबदारपणा असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. या कृत्यामुळे गायींना असलेले रोग जंगलात पसरण्याची भीती आहे. वाघांवर विषप्रयोग करण्यासाठीही गायींचा उपयोग होण्याचा धोका असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

‘जंगलात वनविभागाची साधी गस्तही नाही’

याआधीही गोरक्षण संस्थेने असे प्रकार केले होते. तेव्हा जंगल प्रवेश करण्यासाठी एक तात्पुरते गेट उभारण्यात आले होते. मात्र नंतर ते गेट मोडकळीस आले. आता या जंगलात वनविभागाची साधी गस्तही नाही. फेकून दिलेल्या मृत गायींच्या बाजूने गोंदियाला जाणारी रेल्वेलाईन आहे. याच भागात काही दिवसांपूर्वी 3 वाघ बछडे रुळावर मृत झाले होते. हे जंगल ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या वनविकास महामंडळाने गोरक्षण संस्थेला याआधी नोटीस दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने पुन्हा विल्हेवाटीसाठी या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.

एकीकडे अल्प अनुदानावर चालणाऱ्या गोरक्षण संस्था आणि त्यांच्याकडे असलेली निधीची कमतरता मोठा अडसर आहे. असे असताना सतत होणारी जनावरांची जप्ती संस्थेवर मोठा भुर्दंड टाकणारी ठरत आहे. त्यातून मार्ग काढताना विल्हेवाटीचे असे प्रकार घडत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता वनविकास महामंडळ  वन्यजीव अभ्यासकांच्या मदतीने या समस्येवर कसा तोडगा काढते याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI