REVIEW : महिला शक्तीचं ‘मिशन मंगल’

गेल्या काही वर्षांपासून 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर देशभक्तीपर चित्रपट करण्याची प्रथा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं या वर्षीही कायम राखली आहे. त्याचा 'मिशन मंगल' (Mission Mangal Review) ही त्याच पठडीतला.

REVIEW : महिला शक्तीचं 'मिशन मंगल'

गेल्या काही वर्षांपासून 15 ऑगस्टच्या मुहुर्तावर देशभक्तीपर चित्रपट करण्याची प्रथा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं या वर्षीही कायम राखली आहे. त्याचा ‘मिशन मंगल’ (Mission Mangal Review) ही त्याच पठडीतला. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा या चित्रपटात (Mission Mangal Review) दाखवण्यात आली आहे. 24 सप्टेंबर 2014 मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारतात हा जगातील एकमेव देश आहे.

मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अशक्य आव्हान पेलले आणि भारताची मंगळ स्वारी यशस्वी झाली, हेच मनोरंजक पध्दतीनं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विक्रम गोखले, शर्मन जोशी, नित्या मेनन, किर्ती कुल्हेरी, दलिप ताहिल अशी कलाकारांची भलीमोठी फौज या सिनेमात असून सगळ्याच कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात दिसला आहे. घराघरात शौचालय असायला हवं आणि मासिक पाळी दरम्यान सॅनेटरी पॅडची आवश्यकता समजवणारे चित्रपट करुन नवीन भारत कुमार बनण्याचा प्रयत्न करत असलेल्या अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ तुम्हाला एका प्रेरणादायी प्रवासावर घेऊन जातो.

मंगळ मोहिमेभोवती संपूर्ण सिनेमाचं कथानक गुफंण्यात आलं आहे. वैज्ञानिक तारा शिंदे (विद्या बालन) वरिष्ठ वैज्ञानिक राकेश धवन (अक्षय कुमार) यांचं चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘जीएसएलव्ही’चं प्रक्षेपण अयशस्वी ठरतं. या अपयशी मिशनची जबाबदारी राकेश स्वत:वर घेतो. मिशन अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होते. पण राकेश अशाने खचून जात नाही. अशातच तारा राकेशला मार्स अर्थात मंगळ मोहिम आपण फतेह करु शकत असल्याची ‘आयडियाची कल्पना’ सांगते. मग सुरु होतो ‘मॉम’ अर्थात मिशन मंगलचा प्रवास. तारा आणि राकेशला सुरुवातीला हे मिशन करण्याची परवानगी मिळत नाही. पण नंतर मात्र त्यांच्या हट्टापुढे वरिष्ठांना झुकावं लागतं.

अंतर्गत राजकारणाचा फटका त्यांना बसतो. कारण त्यांचं मिशन फेल जावं म्हणून ऐका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्लई (नित्या मेनन), नेहा सिद्दीकी (कीर्ति कुल्हारी), परमेश्वर नायडू (शर्मन जोशी), अनंत अय्यर (एच.जी.दत्तात्रेय) अशी ‘कच्च्या लिंबूं’ची टीम देण्यात येते. आता या सगळ्या अवलियांना घेऊन राकेश आणि तारा मिशन मंगल’ फतेह कसं करतात याची रंजक गोष्ट म्हणजे हा सिनेमा.

जगात अशक्य असं काहीच नाही असं या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे. पण दिग्दर्शक जगन शक्ती यांनी अजून पटकथेवर मेहनत घेतली असती तर हे मिशन अजून उत्कंठावर्धक झालं असतं. हा सिनेमा खूपच ‘गोडीगोडी’ टाईपमधला वाटतो. त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी मास अपिल दाखवण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी ही लिबर्टी बालिश वाटते. शक्ती यांनी हा अतिरेक त्यांनी टाळला असता तर विषयाचं गांभीर्य अजून राहिलं असतं.

दिग्दर्शकानं होम सायन्स आणि इतर सायंटिफिक तथ्यांच्या आधारावर मंगलयान मिशन समजावण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स अत्यंत साधारण आहे. व्हीएफक्स जर प्रभावशाली असते तर स्पेसमधली दृश्य अजून दमदार झाली असती. जबरदस्त कथा, तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन, उत्कंठावर्धक शेवट ही या सिनेमाची वैशिष्ट्य आहेत. खरंतर पाच महिला वैज्ञानिक कशा पध्दतीनं हे मिशन पूर्ण करतात हे बघणं मनोरंजक आहे. चित्रपटाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची क्लिप दाखवण्याची खरंच गरज होती का ? असा प्रश्न मला पडला आहे. चित्रपटातील काही सीनही अनावश्यक वाटतात. रॉकेट आणि स्पेस सायन्सचे गणित दिग्दर्शकानं अगदी सोप्या पध्दतीनं समजावलं आहे. चित्रपटातील संवादही अगदी साधेसोपे आणि सरळ आहेत. चित्रपटाच्या विषयाचा आवाका जरी मोठा असला तरी तद्दन हिंदी चित्रपटाची चौकट हा सिनेमा पार करु शकलेला नाही. कदाचित हा विषय हॉलिवूडमध्ये हाताळला असता तर त्याची भव्यता अजून वाढली असती. त्या पातळीवर हा सिनेमा निराश करतो. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकानं चित्रपटात जास्त पसारा न दाखवता अगदी कमी वेळात हा सिनेमा आटोपशीर घेतला आहे.

राकेश धवनच्या भूमिकेत अक्षयनं कमाल केली आहे. त्याचे वनलाईनर्स भन्नाट आहेत. ताराच्या भूमिकेत विद्या बालननेही आपली जादू कायम ठेवलीये. एक वैज्ञानिक, बायको आणि आई अशा तिहेरी भूमिकेत तारेवरची कसरत होत असलेली तारा तिने भन्नाट साकारली आहे. विशेष म्हणजे विद्या बालन आणि अक्षय कुमारची सिनेमातील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. मांगलिक असलेल्या परमेश्वर नायडूच्या भूमिकेत शर्मन जोशीनं धमाल केली आहे. त्याचा रोल अजून मोठा असता तर अजून मजा आली असती. सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ति कुल्हेरी या महिला मंडळानं सिनेमात कमाल केली आहे. नारीशक्तीचं दर्शन या सिनेमातून होतं. अनंत अय्यर, दलिप ताहिल, विक्रम गोखले यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी संजय कपूरला मोठ्या पडद्यावर बघून बरं वाटलं. अमित त्रिवेदीचं सिनेमातलं संगीत ठिकठाक आहे.

एकूणच काय तर महिला शक्तीचं हे मिशन ‘मंगल चांगलं’ झालंय.

खरंतर हा सिनेमा अजून चांगला झाला असता. पण खऱ्या आयुष्यातील नायकांची ही नेत्रदीपक कामगिरी मोठ्या पडद्यावर बघणं उत्तम अनुभव आहे. त्यामुळे महिलाशक्तीच्या ‘मिशन मंगल’ला ‘टीव्ही नाईन मराठी’कडून तीन स्टार्स.