मराठा आरक्षणाचा पहिला लाभार्थी, शेतकऱ्याचा मुलगा क्लास 2 अधिकारीपदी!

राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा केल्यानंतर, त्याचे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. कराडचा अमित यादव हा मराठा आरक्षणाचा सातारा जिल्ह्यातील पहिला लाभार्थी ठरला आहे.

मराठा आरक्षणाचा पहिला लाभार्थी, शेतकऱ्याचा मुलगा क्लास 2 अधिकारीपदी!

सातारा :  राज्य सरकारने मराठा आरक्षण कायदा केल्यानंतर, त्याचे लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. कराडचा अमित यादव हा मराठा आरक्षणाचा सातारा जिल्ह्यातील पहिला लाभार्थी ठरला आहे. कराड तालुक्यातील काले गावच्या अमित यादवची, स्पर्धा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 2 अर्थात क्लास टू अधिकारीपदी निवड झाली आहे. अमित हा मराठा आरक्षणाचा नोकरीमध्ये लाभ मिळालेला सातारा जिल्ह्यातील पहिलाच उमेदवार ठरला आहे. अमितला हुलकावणी देणारे यश मराठा आरक्षणामुळे गवसल्याची त्याची भावना आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर, राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) शिक्षणात 12 आणि नोकरीत 13 टक्के आरक्षण लागू केलं. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील 34 जणांची एसईबीसी प्रवर्गातील 13 टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर  झाल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावचा अमित अरविंद यादव याला मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला.

काले गावातील अमित यादव हा सामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहे. वडील आणि तीन चुलते असे एकत्र कुटुंब आहे. वडिलांनी खासगी नोकरी करुन मुलांना  शिक्षण दिले. चुलते गावाकडे शेती, पशुपालन  आणि मजुरी करुन संसार चालवतात.

अमितने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधून B.Tech ही पदवी मिळवली. डिप्लोमा ते डिग्री अॅडमिशनदरम्यान केवळ एका गुणाने त्याला हवं ते कॉलेज मिळालं नाही.

अमितने नंतर टाऊन प्लॅनिंग परीक्षा दिली. मात्र त्यावेळी त्याला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. नगरपरीषद परीक्षेत आरक्षण नव्हते, MPSC पूर्वपरीक्षा 2 गुणांनी हुकली. मात्र यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत SEBC अंतर्गत फॉर्म भरला आणि त्याला मराठा आरक्षणाचा लाभ मिळाला. अमित चांगल्या  गुणांसह पास झाला, त्याला आरक्षणाची जोड मिळाली आणि त्याची क्लास 2 च्या अधिकारीपदी निवड झाली.

अमितच्या रुपाने यादव कुटुंबातील पहिलाच व्यक्ती सरकारी नोकरीत रुजू झाला आहे. मराठा आरक्षणामुळे गरजूंना निश्चितच नोकरी आणि शिक्षणात फायदा होईल, असा विश्वास अमितने व्यक्त केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करणारं पहिलं खातं ठरलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI