बीडमधील माणुसकी, बाहेरुन येणाऱ्यांचं वाजत-गाजत स्वागत, घरातच क्वारंटाईन

| Updated on: May 30, 2020 | 11:52 AM

मुंबईहून गावी आलेल्या दहा नागरिकांचे गावाच्या वेशीवरच वाजतगाजत स्वागत करुन, त्यांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात आले.(Beed villagers welcomes migrant)

बीडमधील माणुसकी, बाहेरुन येणाऱ्यांचं वाजत-गाजत स्वागत, घरातच क्वारंटाईन
Follow us on

बीड : ग्रीन झोन असलेल्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर, बाहेरुन आलेल्या नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हाच दृष्टिकोन बदलावा याच उद्देशाने पिंपळनेर ग्रामस्थांनी एक वेगळं पाऊल उचलले आहे. (Beed villagers welcomes migrant)

मुंबईहून गावी आलेल्या दहा नागरिकांचे गावाच्या वेशीवरच वाजतगाजत स्वागत करुन, त्यांना त्यांच्या घरात क्वारंटाईन करण्यात आले. क्वारंटाईन होण्यावरुन राज्यात अनेक ठिकाणी गंभीर वाद झाल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र बीडमध्ये या अनोख्या सन्मानाने एक नवा पायंडा पडला आहे.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 61 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सहा रुग्ण पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. तर सध्या बीड जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात 49 रुग्ण उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 136 नागरिक, मजुरांनी प्रवेश केला आहे. सर्वच मजूर ज्या त्या गावात क्वारंटाईन आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मजुरांपैकी एकही मजूर पॉझिटिव्ह आढळलेला नाही.

दुसरीकडे मूळ बीड जिल्ह्यातले मात्र मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात वर्षानुवर्ष रहात असलेले हजारो कुटुंब बीड जिल्ह्यात आलेले आहेत. यापैकी बरेच लोक चोरट्या मार्गाने देखील आलेत. त्याचाच प्रादुर्भाव बीडमध्ये पाहावयास मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा, यासाठी शेकडो कुटुंबांना शेतात क्वारंटाईन केले असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे.

कोरोना महामारीचा सामना सर्व थरातून होत आहे. कोरोना बाधितांविषयी कोणताही भेदभाव न करता त्यांना आधार द्या असं सरकारकडून वारंवार सूचविले जात आहे. मात्र मुंबई आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांबद्दल बऱ्याच ठिकाणी तुच्छ वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आणि हाच दृष्टिकोन बदलावा यासाठी पिंपळनेर ग्रामस्थांनी एक पाऊल उचलत माणुसकीचा झरा कायम ठेवला आहे.

Beed villagers welcomes migrant

संबंधित बातम्या 

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!  

बीडमध्ये पुन्हा ‘चिअर्स’! पहिल्याच दिवशी 62 हजार लिटर मद्याची विक्री