वीज मीटरसाठी पैसे भरले, मीटर देण्याआधीच महावितरणने बिलाचा शॉक दिला

वीज मीटरसाठी पैसे भरले, मीटर देण्याआधीच महावितरणने बिलाचा शॉक दिला

सातारा : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसलाय. शेवटी तांत्रिक चूक म्हणून स्पष्टीकरण दिलं जातं. सातार जिल्ह्यातील खटाव तालुक्यातही असाच प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याने वीज मीटर घेण्यासाठी पैसे भरले. पण मीटर दूरच, त्याआधाची महावितरणने शेतकऱ्याला बिलाचा शॉक दिलाय.

सातारा जिल्ह्यातील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून शेतीसाठी वीज कनेक्शन मिळावे यासाठी महावितरणचे उंबरठे झिजवत आहेत. अजूनही यावर म्हणावा असा तोडगा निघालेला नाही. अशीच परिस्थिती घरगुती वीज कनेक्शनचीही आहे. सध्या खटाव तालुक्यातील महावितरणच्या एका बिलाची तालुक्यात चर्चा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खटाव तालुक्यातील महावितरणचे घरगुती वीज कनेक्शनसाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्याला वीजकनेक्शन न देता चक्क महावितरणने 570 रुपयांचे वीज बिल पाठवलंय.

या प्रकारामुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. खटाव तालुक्यातील नढवळ गावचे प्रकाश माने यांनी सहा महिन्यांपूर्वी डिपॉझिट रक्कम भरली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून मीटर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात हेलपाटे मारणे सुरू ठेवले. आज ना उद्या मीटर भेटेल या अपेक्षेने त्यांनी सहा महिने मीटर मिळण्याची वाट पाहिली. मात्र वीज कनेक्शन काही मिळाले नाही. दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांना घरच्या कनेक्शनचे चक्क 570 रुपये वीज बिल आले. घरात वीज पुरवठा नसतानाही वीज बिल नेमकं कशाचं आलं या प्रश्नाने प्रकाश माने हे हतबल झालेत.

प्रकाश माने हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत नढवळ गावातील मानेवस्तीवर राहतात. महावितरण कंपनीने नेहमीप्रमाणे खांबाचे कारण पुढे करुन वीज कनेक्शनसाठी डिपॉझिट भरण्यास सांगितले. मात्र अद्याप त्यांच्या कुटुंबाला वीज कनेक्शन मिळालेले नसल्याची खंत त्यांच्या पत्नी शोभा माने यांनी व्यक्त केली.

सरकारकडून दुष्काळी यादीतून खटाव तालुका वगळल्यामुळे खटावची जनता नाराज आहे. मात्र वीज वितरणच्या कार्यालयाकडूनही अशी शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे या शेतकऱ्याला अजूनही वीज कनेक्शन मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI