सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी, खासगी निवारा केंद्र बंद पाडलं

Namrata Patil

Updated on: Aug 13, 2019 | 7:26 PM

भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडले आहे.

सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी, खासगी निवारा केंद्र बंद पाडलं

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी रोख मदतीसह अन्य काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. मात्र भाजपच्या नगरसेविका गीता सुतार (BJP Corporter Geeta Sutar) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडले आहे. गीता सुतार यांच्या कार्यकर्त्यांनी निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना मारहाण केली असून यात एक पूरग्रस्त महिला आणि एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. तसेच एका महिला पत्रकारालाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेक छावण्या तयार करण्यात आल्या आहे. यात पूरग्रस्तांना जेवणासह इतर आवश्यक गोष्टींची सुविधा मिळते. सांगलीतही मराठा सेवा संघ या ठिकाणी एक खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

गेल्या 7 ते 8 दिवसांपासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे. त्या ठिकाणी जवळपास 500 ते 550 लोक राहत आहे. या सर्व लोकांना जिल्हा कार्यालयातर्फे आलेली मदत पोहोचवली जात आहे. त्याशिवाय शासनाकडून येणारी मदत एकत्रित किटच्या माध्यमातून आज काहींना देण्यात येणार होती.

मात्र अचानक भाजपच्या नगरसेविका गीता सुतार या ठिकाणी आल्या. त्यांनी या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही असा दावा करायला सुरुवात केली. त्यांचा हा दावा खोडून टाकण्यासाठी त्या संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूरग्रस्तांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी आम्ही अशाप्रकारे कोणतीही तक्रार केलेली नाही असे पूरग्रस्तांनी सांगितले.

यानंतर त्या नगरसेविकेला संताप अनावर झाला. तिने सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक पूरग्रस्त महिला, महिला पत्रकार आणि एक कार्यकर्ता असे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका व्यक्तीला आप्तकालीन विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या नगरसेविका आणि तिच्या कार्यकर्त्यांनी या खासगी पूरग्रस्त निवारा केंद्रातील मदतीचे सामानही घेऊन गेल्याचा दावा मराठा सेवा संघांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI