“मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ दिली नाही” युरियाच्या तुटवड्यावरुन खडसेंची टीका

| Updated on: Aug 02, 2020 | 12:04 PM

"साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे" असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ दिली नाही युरियाच्या तुटवड्यावरुन खडसेंची टीका
Follow us on

जळगाव : महाराष्ट्रात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. “मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे म्हणत खडसेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. (BJP Leader Eknath Khadse on urea fertilizer Scarcity)

“शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही” असे खडसे म्हणाले.

“सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा वेळोवेळी व्हावा, अशी मागणी करताना सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याचा घणाघातही एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014  ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही” असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधल्याचे चित्र आहे.

“साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

(BJP Leader Eknath Khadse on urea fertilizer Scarcity)