‘महिला खासदारावर वादग्रस्त टीपण्णी, आझम खान यांचं शीर कापून संसदेवर टांगा’

भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष आफताब आडवाणी यांनी आझम खान यांनी खासदार रमा देवी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांचे शीर कलम करुन संसदेच्या दारात टांगण्याची मागणी केली आहे.

‘महिला खासदारावर वादग्रस्त टीपण्णी, आझम खान यांचं शीर कापून संसदेवर टांगा’


नवी दिल्ली : संसदेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या नेत्यानेही एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष आफताब आडवाणी यांनी आझम खान यांनी खासदार रमा देवी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांचे शीर कलम करुन संसदेच्या दारात टांगण्याची मागणी केली आहे.

आफताब आडवाणी म्हणाले, “खासदार रमा देवी यांच्याविषयी आझम खान यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही याचा निषेध करतो. सरकारने आझम खान यांचं शीर कलम करावं आणि संसदेच्या दारात टांगावे. या कारवाईतून महिलांचा अपमान करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी आणि आझम खानसारख्यांसोबत काय होतं हे लोकांना कळेल.”

‘आझम खान वेडावले, त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे मारावे’

आफताब यांनी आझम खान यांची ही पहिलीच वेळ नसल्याचे म्हणत त्यांच्या आधीच्या वक्तव्यांचाही संदर्भ दिली. ते म्हणाले, “महिलांवरील अत्याचार सहन करायला नको. पहिल्यांदा त्यांनी जयप्रदा यांच्याविरोधात असंच वक्तव्य केलं. आता खासदार रमादेवी यांच्याविषयी देखील त्यांनी तसंच वक्तव्य केलं. मी याआधीच सांगितलं आहे की हा म्हातारा वेडावला आहे. त्यामुळे त्याला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणेच मारले पाहिजे. ते देशासाठी धोकादायक आहेत.”

प्रकरण काय आहे?

आझम खान संसदेत बोलत असताना त्यांनी एका शेरच्या माध्यामातून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. आझम खान सत्ताधाऱ्यांकडे पाहून ‘तु इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला क्यु लुटा’ असं म्हटल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या खासदार रमा देवी यांनीही त्यांना मिश्किलपणे तुम्ही इकडे तिकडे न पाहता माझ्याकडे पाहून बोला असं म्हटलं. त्यानंतर संसदेत एकच हशा पिकला.

याला उत्तर देताना आझम खान यांची चीभ घसरली. आझम खान म्हणाले, “मला तर तुमच्याकडे इतकं पाहावंसं वाटतं की तुम्ही म्हणाल नजर हटवा.  मला तुम्ही इतक्या चांगल्या आणि सुंदर वाटतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलत रहावंसं वाटतं.” यावर खासदार रमादेवी यांनी देखील हजरजबाबीपणे मी तुमची छोटी बहिण असल्याने तुम्हाला असं वाटत असल्याचे उत्तर दिले. यानंतर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी आझम खान यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या माफीची मागणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI