
देशविरोधी आणि धर्मविरोधी लोकांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यांचं चरित्र आणि दिशा स्पष्ट होत आहे, त्यांना लांगूलचालन करायचं आहे, विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मत मिळवायची आहेत. पण जनता हे बघत आहे. त्यांना (ठाकरे) याचं नुकसान सहन करावचं लागेल – देवेंद्र फडणवीस.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे सौर उर्जाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल करण्यात आली आहे. तब्बल 12 हजार हून अधिक झाडं बलगवडे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी नेस्तनाबूत करण्यात आली आहेत. ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार करण्यात आला असून त्यामुळे संतापाचं वातावरण आहे.
पुण्यात काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दादांची राष्ट्रवादी सोडून काँग्रेस सोबत येण्याचं सुप्रिया सुळेंना आवाहन करण्यात आलं आहे. मविआ म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ असं अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठाणे महापालिकेचा महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजपकडून 40-45 जागांची मागणी आहे, मात्र शिवसेनेकडून इतक्या जागा सोडण्यास नकार देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले. तिन्ही नेत्यांमध्ये ठाण्यासंदर्भात बैठक पार पडणार आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र लढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चाही पार पडली आहे. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांनाही या आघाडीत सामावून घेण्याची तयारी काँग्रेस आणि ठाकरे गटाने दर्शवली आहे. अजित पवार गटाला सोबत घेण्यास काँग्रेसने स्पष्ट विरोध केल्याने, आता शरद पवार गट काय भूमिका घेणार आणि पुण्यात महाविकास आघाडीचे नेमके स्वरूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नागपूरमधील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आज अमरावतीत होणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीकडे लागले आहे. शिवसेनेने ४५ जागांचा प्रस्ताव मांडून आक्रमक पवित्रा घेतला असला, तरी भाजप किती जागा सोडण्यास तयार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मित्रपक्षांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यमान जागांचे समीकरण यामुळे जागावाटपाचा हा पेच अधिकच गडद झाला असून, आजच्या बैठकीत तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे यांना पराभूत महिला उमेदवारांनी भररस्त्यात घेरत संताप व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीत केचे यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप या महिलांनी केला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आमदार केचे यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे मला राजकीय जीवनातून नेस्तनाबूत करण्यासाठी रचलेले मोठे षडयंत्र असून यामागे काही बड्या नेत्यांचा हात आहे, असा खळबळजनक आरोप दादाराव केचे यांनी केला आहे. मी पूर्ण ताकतीने भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले असताना केवळ बदनामी करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले असून, संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी शरद पवार गट-अजित पवार गट यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. मात्र अजित पवार गट त्यांना ३० जागा देण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. काल झालेल्या दीर्घ बैठकीनंतरही दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका लावून धरल्याने हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. शहरात एकेकाळी राष्ट्रवादीची मोठी ताकद राहिली असून, दोन्ही गट एकत्र आल्यास भाजपला कडवे आव्हान देता येईल, असे मानले जात आहे. मात्र, जागांच्या आकड्यावरून सुरू असलेली ही खेचाखेची लवकर न मिटल्यास इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने बंडखोरी रोखण्यासाठी एक मोठी रणनीती आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी भाजप शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी आपले एबी फॉर्म थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहे. सध्या एका जागेसाठी चार-चार उमेदवारांनी अर्ज भरल्याने पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ज्या उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला असेल, त्याचाच अर्ज वैध ठरवला जातो आणि उर्वरित अर्ज बाद होतात. पक्षाच्या या खेळीमुळे शेवटच्या क्षणी अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून, इच्छुकांमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे.
स्वतंत्र नगरपालिका मागणी फेटाळल्याने सर्वपक्षीय संघर्ष समिती आक्रमक. सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन. बहिष्कार झुगारल्यास निवडणुकीत सक्रिय हस्तक्षेप करून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा. संघर्ष समितीच्या निर्णयामुळे पालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 13, 16, 17, 19, 30 व 31 वर मोठा राजकीय परिणाम संभव
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराचा एबी फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्याकडे देणार- सूत्रांची माहिती बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची शेवटच्या दिवशी रणनीती 30 डिसेंबर रोजी एबी फॉर्म देण्याची तयारी. इच्छुक उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका एका जागेसाठी चार उमेदवारांचे अर्ज.
भाजपचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य समितीत सहभागी…आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका संपन्न. मात्र जागावाटपावर तणाव कायम.बदलापूर-अंबरनाथ विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला; कल्याण-डोंबिवलीत 5 वर्षांचे महापौर आणि ८३ जागांची केली मागणी. आमच्या मागण्या मान्य केल्या तर युती करू अन्यथा भाजप कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत नाराजी सूर स्वतंत्र लढण्याची मानसिकता भाजप माजी आमदार नरेंद्र पवार
पुणे महानगरपालिका निवडणुकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांकडे ४० ते ४५ जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारण ३० जागा देण्याची भूमिका. कालच्या बैठकीनंतर ही जागा वाटपाचा तिढा अद्याप ही कायम
आज पुन्हा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता. 45 जागांवर शिवसेना ठाम सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्रपणे लढण्याची देखील शिवसेनेची तयारी. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे युती करण्यासंदर्भात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये चर्चा. आज सकारात्मक चर्चा न झाल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा होऊ शकतो निर्णय
प्रभागात ज्या पक्षाकडे स्ट्रॉंग उमेदवार असेल ति जागा त्या पक्षाला सुटणार. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधू एकत्र येताच नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे.त्यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा आज होणार होती मात्र आता रविवारी होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पेच अजून काही सुटलेला नाही.युती संदर्भात दोन्ही पक्षाच्या पाच बैठका निष्फळ ठरत आहेत. आज पुन्हा भाजपा आणि शिवसेनेची युती आणि जागा वाटप संदर्भात बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. युती आणि जागा वाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची आज संध्याकाळी 6 वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या या मशाल रॅलीला युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या मशाल रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आवाहन केले आहे. क्रांती चौक ते गुलमंडी मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगरला हवाई नकाशावरून ‘डिसकनेक्ट’ करण्याचा उद्योग इंडिगो एअरलाइन्सने सुरूच ठेवला आहे. सुरुवातीला केवळ १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित केलेली हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर दुपारची हवाई सेवा आता संपूर्ण हिवाळी सत्रासाठी (मार्चपर्यंत) रद्द करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.विमानांची कमतरता आणि केंद्र सरकारच्या उडान योजनेतील अनुदानाचा फायदा घेण्यासाठी इंडिगोने प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. हैदराबादहून दुपारी १०:५५ वाजता निघून १२:२५ वाजता शहरात येणारे आणि दुपारी १२:५५ वाजता परतीसाठी झेपावणारे विमान अत्यंत लोकप्रिय होते.या नियमित सेवेला आधी आठवड्यातून तीन दिवस केले. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत स्थगितीचे नाटक केले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील,आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.राजकमल चौकात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.बांगलादेश सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली आहे.
मुंबईतील जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेची फेरी सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर नाशिकमध्ये ठाकरे सेनेतील माजी महापौर हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले आहेत. तर पुण्यामध्ये काका-पुतण्यामधील जागा वाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनिकरणाची चर्चा सुद्धा सुरू आहे. मनपा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे दोन्ही भाषेत इंग्रजी आणि मराठीत देता येणार आहे. प्रकाश महाजन हे शिंदे सेनेत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात नोटांचे मोठे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर रेल्वे प्रवास महागला आहे. एससी पासून ते सर्वसाधारण कोचच्या तिकीटाचे दर वाढले आहेत.