ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? : विवेक ओबेरॉय

ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? : विवेक ओबेरॉय

मुंबई : पश्चिम बंगालमधील कोलकात्यात मंगळवारी (14 मे) भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार, जाळपोळ झाली. भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामुळे पश्चिम बंगाल ते दिल्लीपर्यंतचं राजकीय वातावरण तापलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने देखील या वादात उडी घेतली आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली.

ममता बॅनर्जी यांच्या ‘लोकतंत्र खतरे में है’ या विधानाच्या बातमीचा एक फोटो विवेकने ट्वीट केला. त्यासोबत विवेकने लिहिले, “मला कळत नाही आहे की, दीदींसारख्या आदरणीय महिला सद्दाम हुसेनसारख्या का वागत आहेत. दुर्दैव बघा, लोकशाहीला धोका आहे आणि तो स्वत: हुकूमशाह दीदींपासून आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तजिंदर बग्गा. ही दीदीगिरी चालणार नाही.”


यासोबत विवेकने #SaveBengalSaveDemocracy #FreeTajinderBagga हे हॅशटॅगही वापरले.

प्रकरण काय?

सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांच्यावरील आक्षेपार्ह मीम्स शेअर केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले. या व्यतिरिक्त कोलाकाता येथे तजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना, कार्यकर्त्यांना अटक झाल्याचा दावा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी केला.

ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना केलेला सद्दाम हुसेन कोण?

सद्दाम हुसेन हा 1979 ते 2003 अशा दोन दशकांहून अधिक काळ इराकच्या राष्ट्रपती होता. त्याचं पूर्ण नाव सद्दाम हुसेन अब्द अल-माजिद अल-तिक्रिती आहे. सद्दाम हुसेन याने वयाच्या 31 व्या वर्षी जनरल अहमदच्या साथीने इराकची सत्ता मिळवली. 1979 मध्ये तो स्वत: इराकचा राष्ट्रपती बनला. 1982 मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहार प्रकरणी सद्दाम हुसेनवर 150 शियापंथीय लोकांना ठार मारणे, रासायनिक अस्त्रे बाळगणे आणि अमानवी कृत्य करणे असे आरोप होते. या प्रकरणी त्याला 30 डिसेंबर 2006 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI