मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना बजावलेल्या तीन महिन्यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली.

मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती
Yashomati Thakur
| Updated on: Oct 22, 2020 | 12:00 PM

नागपूर : पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा मिळाला आहे. ठाकूर यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Congress Minister Yashomati Thakur gets relief by Nagpur bench in Police Constable beating case)

मंत्री यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यावर निर्णय घेताना उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली. कोर्टाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.

ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना 15 ऑक्टोबरला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली होती.

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला.

“गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा”

“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे तर त्यांनी स्वत:च या प्रकरणात आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तो त्यांनी दिलेला नाही. म्हणूनच भाजप आज त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आंदोलन करेल’ असं भाजपचे शिवराय कुलकर्णी म्हणाले होते.

दुसरीकडे भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुरांवर ट्विटच्या माध्यमातून बोचरा वार केला आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या विद्यमान मंत्री यशोमती ठाकुर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल? असा निशाणा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुर यांच्यावर साधला होता.

संबंधित बातम्या :

गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी

(Congress Minister Yashomati Thakur gets relief by Nagpur bench in Police Constable beating case)