Corona Care and Locked Down | लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताने पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळच्या सीमा सील केल्या आहेत. What is Locked Down

Corona Care and Locked Down | लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?
| Updated on: Mar 15, 2020 | 4:21 PM

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’चा वाढता प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पेन, इटलीसारख्या देशांनी ‘लॉक डाऊन’चा पर्याय निवडला आहे. त्यामुळे ‘लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?’ हा प्रश्न विचारला जात आहे. (What is Locked Down)

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताने पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळच्या सीमा सील केल्या आहेत. सीमेवरील प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने याआधीच उच्चपदस्थ अधिकारी वगळता परदेशी नागरिकांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करुन त्यांना भारतात प्रवेशबंदी केली आहे.

‘लॉक डाऊन’मध्ये कशी असते परिस्थिती?

‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही स्थिती किती काळासाठी असेल, हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे.

इटली आणि स्पेनमध्ये लागू केलेल्या ‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना शक्यतो घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. चीनमधील ज्या वुहान प्रांतातून ‘कोरोना’चा उगम झाला, तिथेही ‘लॉक डाऊन’ करण्यात आलं होतं.

घरातून कार्यालयीन काम करणे शक्य नसेल, तरच बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व शाळा आणि विद्यापीठांसह रेस्टॉरंट्स, बार आणि इतर अनावश्यक किरकोळ दुकानं बंद करण्यात आली आहेत. लांब पल्ल्याच्या बस आणि रेल्वेसेवा बंद केल्या जाऊ शकतात, किंवा फेऱ्यांची संख्या कमी करण्यात येऊ शकते. (What is Locked Down)