देवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा

| Updated on: Oct 19, 2020 | 8:42 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री 7.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रोसा गावात पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

देवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा
Follow us on

उस्मानाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीपासून सुरु झालेला नुकसान पाहणी दौरा अजूनही सुरुच आहे. रात्री 7.15 वाजता त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील रोसा गावात पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. फडणवीस यांनी रात्री 7.15 वाजता रात्रीच्या अंधारात लाईट लावून पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. (Devendra fadanvis Visit osmanabad Rosa Village)

पावसाने कांदा, सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे तसंच शेती वाहून गेल्याचं गाऱ्हाणं शेतकऱ्यांनी फडणवीसांच्या कानावर घातलं. तसंच मदत न मिळाल्यास आत्महत्या केल्यावाचून आमच्याकडे काही एक पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी फडणवीसांना सांगितलं. त्यावर ‘तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही. आपण सरकारकडे जास्तीत जास्त मदत मागू’, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी रोसा गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. “परतीच्या पावसाने आमचं होत्याचं नव्हतं झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने आमचं कंबरडं मोडलंय. काल-परवा पडलेल्या पावसाने आमचं फार नुकसान झालंय. सरकारने आतातरी आम्हाला तात्काळ मदत करावी”, अशा व्यथा शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर मांडल्या.

“तुम्ही काही काळजी करु नका. सरकारकडून आपण जास्तीत जास्त मदत मिळवून घेऊ. काळ कठीण आहे. परंतु जिद्द सोडायची नाही. सरकारशी भांडून तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन”, असा धीर फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लातुरात, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

परतीच्या पावसाचा किती मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासासंबंधी आश्वासने नेत्यांनी दिली. मात्र सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु असले तरी केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत मदतीचा चेंडू एकमेकांकडे टोलवत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी अजूनही राज्य सरकारने किंवा केंद्र शासनाने भरीव मदतीची घोषणा केलेली नाही.

देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दुपारपर्यंत हे दौंड-बारामती भागात होते. त्यानंतर भिगवण, इंदापूर, करमाळ्याचा त्यांनी दौरा केला. “सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा सौलापूर दौरा

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर आणि पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

(Devendra fadanvis Visit osmanabad Rosa Village)

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा, बारामतीतून सुरुवात

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात!

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस