प्राध्यापकांचा पगार एक तारखेला होणार, विलंब करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई, धनराज मानेंची माहिती

| Updated on: Nov 18, 2020 | 8:53 PM

प्राध्यापकांचे पगार वेळेत न केल्यास महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी दिला आहे. ( Dhanraj Mane warns colleges to pay salary of professor on time)

प्राध्यापकांचा पगार एक तारखेला होणार, विलंब करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई, धनराज मानेंची माहिती
Follow us on

पुणे: राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगाराला विनाकारण उशीर करणाऱ्या संस्था, महाविद्यालये उच्च शिक्षण संचालनालयाच्या रडारवर आहेत. प्राध्यापकांचे पगार वेळेत न केल्यास महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी दिला आहे. (Dhanraj Mane warns colleges to pay salary of professor on time)

राज्यातील काही महाविद्यालयामधील प्राध्यापकांचे पगार उशिरा होत असल्याच्या तक्रारी उच्च शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये राज्य सरकारकडून पगार जमा करुनही पगाराची रक्कम प्राध्यापकाच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब करण्यात येत होता. सरकारनं पगाराची रक्कम जमा करुन देखील संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीसाठी पगार आठवडाभर उशिरानं होत आहेत ही फार गंभीर बाब आहे, असं डॉ.धनराज म्हणाले.

1 तारखेला प्राध्यापकांचे पगार करा

शासनाकडून वेळेत अनुदान देऊनही वरिष्ठ महाविदलयांच्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. आगामी काळात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला संबंधित प्राध्यापकाच्या आणि कर्मचाऱ्याच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावेत. पगार जमा केल्याबाबतचा अहवाल शासनाकडे जमा करण्यात यावा, असे निर्देश डॉ.धनराज माने यांनी दिले आहेत.

राज्यात अशा पद्धतीने 10 टक्के महाविद्यालयात विलबांचे वेतन दिले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून प्राध्यापकांचे पगार महिन्याच्या एक तारखेला करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात अशी प्रकरणं निदर्शनास आल्यास महाविद्यालय आणि प्राचार्य यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा धनराज माने यांनी दिला.

5 तारखेपर्यंत अहवाल सादर करावा लागणार

राज्यातील शासकीय आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार दर महिन्याच्या 1 तारखेला करावा लागणार आहे. याबाबतचा अहवाल तयार करुन विभागीय शिक्षक सहसंचालक कार्यालयांना द्यावा लागणार आहे. प्राध्यापकांचा पगार 1 तारखेला केल्याचा अहवाल देखील उच्च शिक्षण सचालनालयास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीनं प्राध्यापकांचा पगार 1 तारखेला करणे आणि त्याचा अहवाल 5 तारखेपर्यंत जमा करण्याबाबतचे परिपत्रक संबंधित महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.धनराज माने यांनी दिली.

संबंधित बातम्या :

वडिलांचे गुण पाहून मुलगा भारावला, बिकट परिस्थिमुळे शिक्षण सुटलेल्या वडिलांबाबत श्रीकांत शिंदे म्हणतात….

शिक्षण आपल्या दारी उपक्रमामुळे गावच बनली शाळा; गल्लीतच लागले गृहपाठाचे फलक

( Dhanraj Mane warns colleges to pay salary of professor on time)