गडचिरोलीत मेट्रो नेल्यास नक्षलवादाला आळा : एकनाथ शिंदे

| Updated on: Jan 28, 2020 | 1:02 PM

मागास गडचिरोली जिल्हा इतर जिल्ह्यांशी जोडला जावा. त्यामुळे नक्षलवाद संपण्यास मदत होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीत मेट्रो नेल्यास नक्षलवादाला आळा : एकनाथ शिंदे
Follow us on

नागपूर : नागपूरनंतर गडचिरोलीमध्येही मेट्रो नेल्यास नक्षलवादाला आळा बसेल, असा विश्वास नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी शिंदे नागपुरात उपस्थित (Eknath Shinde wants Gadchiroli Metro) होते.

नागपूरसारखीच गडचिरोलीतही मेट्रो व्हावी. मागास गडचिरोली जिल्हा इतर जिल्ह्यांशी जोडला जावा. त्यामुळे त्या भागात बॅकलॉग भरुन निघेल आणि नक्षलवाद संपण्यास मदत होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मेट्रोसारख्या प्रकल्पांची नागपूर आणि विदर्भाला गरज आहे. त्यामुळे अशा प्रकल्पात कुठल्याही अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेऊ, अशी हमीही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

नागपूर मेट्रोवरुन श्रेयवाद, फडणवीसांकडून मोदींचे आभार, केदार म्हणाले विलासरावांची संकल्पना, राऊतांकडून पृथ्वीबाबांना श्रेय

नागपुरातील बहुप्रतीक्षित लोकमान्यनगर ते बर्डी मार्गावरील मेट्रोचं आज लोकार्पण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनिल केदार उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं.

सीताबर्डी ते लोकमान्यनगर ही मेट्रो असून, 11 किलोमीटरचा मेट्रोमार्ग आहे. या मार्गावर एकूण 11 स्टेशन असून आजपासून सहा मेट्रो स्टेशन सुरु होत आहेत. हिंगणा शहरातील प्रवासी, MIDC कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी श्रेयवादावरुन चांगलीच जुगलबंदी रंगली. सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित असल्याने, प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपणच ही मेट्रो आणल्याचा दावा केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मेट्रो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मेट्रोची मूळ संकल्पना ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडल्याचा दावा केला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर मेट्रोच्या प्रस्तावावर सही केली होती, त्यामुळे आज मेट्रोचा हा कार्यक्रम होत असल्याचं नमूद केलं.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागे लागून या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केल्याचं म्हणत, आपलाही दावा दाखल केला.

Eknath Shinde wants Gadchiroli Metro