काश्मिरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, DSP शहीद

काश्मिरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, DSP शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. यापैकी एकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, डीएसपी अमन ठाकुर हे या चकमकीत शहीद झाले आहेत. तसेच, डीएसपी अमन ठाकुर यांचे अंगरक्षकही जखमी झाले आहेत, तर दोन जवानही या चकमकीत जखमी झाले होते. ही चकमक अद्यापही सुरु आहे.

या चकमकीत शहीद झालेले अमन कुमार हे आयपीएस अधिकारी होते. ते काश्मीर कॅडरमधून 2011 साली आयपीएस झाले होते. गेल्या दीड वर्षांपासून कुलगाममध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे नेतृत्व करत होते.

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील तारिगाम भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर सैन्याने या क्षेत्राला घेराव घातला. सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरु असतानाच अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सैन्यानेही याचे या गोळीबाराचे चोख प्रत्युत्तर दिले.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशनची गती वाढवली होती. नुकतचं सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याचा खात्मा केला. तो 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता. तसेच जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हिलाल यालाही ठार करण्यात लष्कराला यश आले.

काश्मीर खोऱ्यात जवळपास 60 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दल ‘ऑपरेशन-60’ राबवत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI