कामगाराला ‘कोरोना’ची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई नाही

| Updated on: Apr 22, 2020 | 4:45 PM

कामगाराला 'कोरोना' विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे खोटे वृत्त सोशल मीडियावर पसरवले केले जात आहे (Fake News about action against employer if employee infected with corona virus)

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई नाही
Follow us on

मुंबई : कारखाना किंवा आस्थापनेमधील कर्मचारी-कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेत तथ्य नसल्याचं सरकारने सांगितलं आहे. (Fake News about action against employer if employee infected with corona virus)

कामगाराला ‘कोरोना’ विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनाच्या बैठकीत ठरल्याचे खोटे वृत्त सोशल माध्यमे आणि व्हॉट्सॲपवरुन फॉरवर्ड केले जात आहे. मात्र अशी कोणतीही बैठक महाराष्ट्रात झालेली नाही, त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सुतराम संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन नाही, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

फॉरवर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरवण्यात येत आहे. (Fake News about action against employer if employee infected with corona virus)

हेही वाचा : अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणूची लागण झाली, तर मालकाविरुद्ध कारवाई होईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे पसरवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.

कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.