आचार्य अत्रेंच्या कन्या – प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश

आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे 'अश्रूंचे नाते', आचार्य अत्रे - प्रतिभा आणि प्रतिमा, पपा - एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा मीना देशपांडे यांनी लिहिली.

आचार्य अत्रेंच्या कन्या - प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश

न्यूयॉर्क : प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. मीना देशपांडे या महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. (Famous Writer Meena Deshpande passed away)

कवी-लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मीना देशपांडे यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली. साहित्यिक वडील आचार्य अत्रे आणि लेखिका बहीण शिरीष पै यांच्या साथीने मीना देशपांडे यांचे साहित्यही बहरले.

आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे ‘अश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा-कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले.

अवघ्या चार दिवसांपूर्वी (2 सप्टेंबर) त्यांच्या थोरल्या भगिनी शिरीष पै यांची पुण्यतिथी होती. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र स्थानिक वेळेनुसार 6 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा:

आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
आचार्य अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)
पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)
मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित चरित्र )
मी असा झालो (आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच ‘मी कसा झालो’ या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)
ये तारुण्या ये (कथासंग्रह)
हुतात्मा (कादंबरी)
महासंग्राम (कादंबरी)

(Famous Writer Meena Deshpande passed away)

Published On - 9:28 am, Mon, 7 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI