Nirmala Sitharaman | स्थलांतरित मजूर, शेतकरी ते फेरीवाले, निर्मला सीतारमण यांच्या कोणासाठी कोणत्या घोषणा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण (Finance Minister Nirmala sitharaman) यांनी देशभरातील फेरीवाल्यांसाठी विशेष योजनेची घोषणा केली.

Nirmala Sitharaman | स्थलांतरित मजूर, शेतकरी ते फेरीवाले, निर्मला सीतारमण यांच्या कोणासाठी कोणत्या घोषणा?

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (13 मे) पत्रकार परिषद घेऊन कुठल्या क्षेत्राला आणि कुठल्या व्यवसाला? काय मिळेल याबाबत माहिती दिली होती. निर्मला सीतारमण यांनी आज (14 मे) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन या पॅकेजची सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाले, गरिब, होतकरु मजूर यांच्यासाठी जवळपास 9 मोठ्या घोषणा केल्या जातील, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

पुढील 2 महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य

“स्थलांतरित मजुरांना पुढील 2 महिन्यांसाठी मोफत अन्नधान्याचं वाटप केलं जाईल. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना 5 किलो गहू-तांदूळ, एक किलो हरभरा दिला जाईल. यासाठी 3500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा जवळपास 8 कोटी मजुरांना फायदा होईल. या योजनेला लागू करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असेल”, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

स्थलांतरित शहरी मजुरांना कमी भाड्यात घर देणार

“पीएम आवास योजना आता मजुरांसाठी देखील लागू केली जाईल. शहरातील गरीब नागरिक आणि मजुरांनाही पीएम आवास योजनेचा लाभ घेता येईल. सरकार या मजुरांना परवडेल अशी भाड्याची घरे उपलब्ध करु देईल. PPP मॉडेलवर आधारित स्वस्त भाड्याचे संकुल उभारु, शहरी गरीब आणि मजुरांना स्वस्त भाड्याची घरे देऊ, उद्योजकांनाही संकुले उभारण्यास प्रोत्साहन देणार, राज्यांच्या संस्थांना संकुले उभारण्यास मदत करु”, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

वन नेशन वन रेशन कार्ड, देशात कुठेही रेशन मिळणार

“1 जूनपासून एक देश, एक रेशन कार्ड संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. यावर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 23 राज्यातील 67 कोटी लाभार्थींना याचा फायदा दिला जाणार आहे. मार्च 2021 पर्यंत सर्व लाभार्थ्यांचा या योजनेचा फायदा मिळेल, अशी योजना आखण्यात आली आहे. देशभरात 80 कोटी पेक्षाही जास्त रेशनकार्डधारक आहेत. त्यांना आता देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून रेशन मिळेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतामण यांनी केली.

‘मनरेगा अंतर्गत स्थलांतरित मजुरांना रोजगार उलब्ध करु’

कोरोनामुळे स्थलांतरित मजूर आपापल्या गावी निघाले आहेत. या मजुरांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली. “केंद्र सरकारकडून मनरेगा अंतर्गत या मजुरांना रोजगार दिला जाणार आहे. या योजनेचा 2.33 कोटी लोकांना फायदा होईल”, अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं.

‘शहरी भागातील गरिबांची जेवणाची आणि निवाऱ्याची व्यवस्था’

“शहरी भागातील गरिबांसाठी 11,000 कोटी रुपयांची मदत केली गेली आहे. लॉकडाऊनदरम्यान हातावरती पोट असणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सरकारकडून जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारला आपातकालीन फंड दिला गेला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“शहरी भागातील गरिबांची राहण्याची व्यवस्थादेखील केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून गरिबांना शेल्टर होम आणि तीन वेळचं जेवण दिलं जात आहे”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी 25 लाख नवे किसान क्रेडीट कार्ड जारी

“देशातील शेतकऱ्यांनी 4.22 लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. या कर्जाच्या व्याजावर 3 महिन्यांसाठीसूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर देशभरात 25 लाख नवे किसान क्रेडीट कार्ड जारी करण्यात आले आहेत”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुद्रा शिशू लोन धारकांसाठी 1500 कोटींची मदत

मुद्रा शिशू लोन धारकांसाठी 1500 कोटींची मदत केली जाणार आहे. मुद्रा शिशू लोनअंतर्गत 50 हजारांपर्यंतचे कर्ज दिलं जाईल. मुद्रा शिशू लोनवर 2% व्याजमाफी दिली जाईल. या योजनेचा 3 कोटी मुद्रा शिशू लोनधारकांना लाभ मिळेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

फेरीवाल्यांना 10 हजारांचं कर्ज मिळणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारमण (Finance Minister Nirmala sitharaman) यांनी देशभरातील फेरीवाल्यांसाठी विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार फेरीवाल्यांना 5 हजार कोटींची मदत करणार आहे. देशातील 50 लाख फेरीवाल्यांना 5 हजार कोटींचे कर्जवाटप केलं जाणार आहे. या योजनेमार्फत प्रत्येक फेरीवाल्याला 10 हजार रुपयांचं कर्ज दिलं जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मली सीतारमण (Finance Minister Nirmala sitharaman) यांनी केली.

संबंधित बातम्या :

Nirmala Sitharaman Live | मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी

Published On - 5:44 pm, Thu, 14 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI