आधी सशाला मारलं, नंतर पोटच्या मुलांना, मग दोन महिलांसह बिझनेसमनची आठव्या मजल्यावरुन उडी
गाझियाबादमधील इंदिरापुरम भागात राहणाऱ्या 45 वर्षीय गुलशन वासुदेव याने दोन मुलांची हत्या करुन पत्नी आणि मॅनेजर महिलेसह आत्महत्या केली

गाझियाबाद : पोटच्या दोन मुलांची हत्या करुन एका बिझनेसमनने पत्नी आणि मॅनेजर महिलेसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. आपल्या पश्चात पाळीव सशाचे हाल व्हायला नकोत, म्हणून त्याचाही जीव घेण्यात आला होता. विशेष म्हणजे घराच्या भिंतीवरच त्यांनी सुसाईड नोट (Ghaziabad Family Murder Suicide) लिहिली आहे.
गाझियाबादमधील इंदिरापुरम भागात राहणाऱ्या 45 वर्षीय गुलशन वासुदेव याने सहकुटुंब आत्महत्या केली. आधी गुलशनने 18 वर्षांची मुलगी कृतिकाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर 13 वर्षांचा मुलगा ऋत्विकचाही गळा कापून जीव घेतला. याचवेळी घरातील पाळीव सशालाही त्यांनी ठार केलं. त्यानंतर 43 वर्षीय पत्नी परवीन आणि 38 वर्षी बिझनेस मॅनेजर संजना यांच्यासह गुलशनने आपल्या आठव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून खाली उडी मारली.
मंगळवारच्या सकाळी इमारतीखाली तिघांचे मृतदेह पाहून कृष्णा अपरा सोसायटीतील सर्वांचा थरकाप उडाला होता. मात्र त्यांचं घर उघडून पाहिल्यावर शेजाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. पहाटे 5.15 वाजता पोलिसांना या प्रकाराविषयी कळवण्यात आलं. इमारतीतून उडी मारलेली एका महिला गंभीर जखमी होती, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
गुलशन वासुदेवच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे त्याने आत्महत्या केल्याचा कयास आहे. ‘आमच्या मृत्यूला राकेश वर्मा जबाबदार आहे’ असं आत्महत्येपूर्वी घराच्या भिंतीवर त्यांनी लिहून ठेवलं होतं. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या
आपल्या पाच जणांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैशांची सोयही त्याने करुन ठेवली. ‘आम्हा पाचही जणांना एकत्रच अग्नि द्यावा, अशी आमची इच्छा आहे’ असं त्यांनी घराच्या भिंतीवर लिहिलं होतं.
गुलशन यांचे जवळचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार रमेश अरोरा यांच्या जबाबाने पोलिसही हादरुन गेले. गुलशनने दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अरोरा यांना व्हिडीओ कॉल केला. त्यांना आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह दाखवले. हे पाहून अरोरा भयकंपित झाले.
‘आयुष्यात आर्थिक संकटं येतात-जातात. हे टोकाचं पाऊल उचलू नकोस’ अशी मिन्नतवारी अरोरांनी केली. मात्र गुलशनने काही-एक ऐकून न घेता ‘सॉरी’ बोलून फोन कट केला. त्यानंतर दोघींसह गुलशनने आपली जीवनयात्रा (Ghaziabad Family Murder Suicide) संपवली.