सांगलीच्या तहसीलदारांकडे 25 कोटी सुपूर्द, सकाळी रोख मदतीचं वाटप

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Aug 12, 2019 | 6:56 PM

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला (Sangli Kolhapur flood) रोख 5 हजार रुपये दिले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. रोख रक्कम पूर्ण देता येणार नाही म्हणून फक्त 5 हजार रुपये देत आहोत, वेळेत पैसे मिळतील याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

सांगलीच्या तहसीलदारांकडे 25 कोटी सुपूर्द, सकाळी रोख मदतीचं वाटप

सोलापूर/पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील (Sangli Kolhapur flood) पूरग्रस्तांना तातडीने रोख मदतीचं वाटप सुरु केलं जाणार आहे. सांगलीच्या तहसीलदारांकडे दोन दिवसांपूर्वीच 25 कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला (Sangli Kolhapur flood) रोख 5 हजार रुपये दिले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. रोख रक्कम पूर्ण देता येणार नाही म्हणून फक्त 5 हजार रुपये देत आहोत, वेळेत पैसे मिळतील याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दोन दिवस घरात पुराचं पाणी राहिल्यास ग्रामीण भागात प्रति कुटुंब 10 हजार आणि शहरी भागात प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत दिली जाते. यापैकी 5 हजार रुपये रोख दिले जात आहेत, जेणेकरुन पूरग्रस्तांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता येईल.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनीही पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पूरस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली. विभागात एकूण 4 लाख 74 हजार 226 जणांना स्थलांतरित करण्यात आलंय, यापैकी सांगलीतील आकडा 1,85,855 आणि कोल्हापुरात 2,47,678 स्थलांतरित आहेत.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 • कोयना धरणातून विसर्ग कमी झालाय. सध्या 52882 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे, तर कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होण्यास मदत होईल.
 • पुणे-बंगळुरु महामार्गावर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, वैद्यकीय औषधे, पाणी टँकर यांना पाठवण्यात आलं आहे. सांगलीत तीन तालुक्यातील 12 गावं आणि 22936 नागरिक अजून पाण्याने वेढले आहेत.
 • कोल्हापूरमधील चार तालुक्यातील 18 गावं पाण्याने वेढली आहेत. इथे 47 हजार नागरिक आहेत, त्यांना बोट आणि हेलिकप्टरमधून मदत दिली जात आहे.
 • सोलापूर विभागात दोन तालुके सोळा गाव पाण्याने वेढली आहेत.
 • विभागात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला. सांगली 21, कोल्हापूर-7, सातारा-7, पुणे-7, सोलापूर 1 (3 अजून बेपत्ता), सांगलीत 2 मृतदेह सापडले असून त्यांची ओळख झाली नाही, रात्री हे मृतदेह सापडले आहेत.
 • वैद्यकीय पथकंही कार्यरत आहेत, बचावपथकांकडूनही मदतकार्य केलं जात आहे.
 • पूरग्रस्तांना 30 जीवनावश्यक वस्तूंचं कीट देण्याचा प्रयत्न आहे.
 • एसटी वाहतूक सुधारणा झाली आहे. कोल्हापूरमध्ये 31 पैकी 15 मार्ग सुरु झाले, तर सांगलीत 45 पैकी 15 मार्ग सुरु झाले.
 • 30 बाधित तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका यांच्याकडून पाणी ओसरल्यावर गावं स्वच्छ आणि कोरडे केले जातील.
 • वीज- विभागात 26 उपकेंद्र बंद आहेत, वीज पुरवठा सुरु करण्यावर सध्या भर दिला जातोय, काही ठिकाणी वीज सुरु झाली आहे.
 • आतापर्यंत 313 एटीएम सुरु झाले आहेत, ज्यात 45 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली.
 • कोल्हापुरात मंगळवार सकाळ किंवा दुपारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल.
 • मंगळवार सकाळपासून पूरग्रस्त कुटुंबांना प्रति कुटुंब 5 हजार रुपये रोख आणि कॅम्प सोडून जाणाऱ्यांना धान्य वाटप केलं जाईल.
 • पूरग्रस्त भागात जास्तीच्या दराने विक्री करणाऱ्यांवर वजनमापे विभागाकडून कारवाई केली जाईल.
 • 50 टन पशुखाद्य पुरवठा करण्यात आला. पाणी कमी झाल्यावर चारा, औषधे पुरवठा करण्यात येईल.
 • पुलांच्या तपासणीसाठी 76 अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पाणी कमी झाल्यानंतर प्रत्येक पुलाची तपासणी करुनच पूल सुरु केला जाईल.
 • नुकसानग्रस्त सरकारी इमारती, शाळा, घरे यांचं सर्वेक्षण केलं जात आहे. स्मशानभूमीची काहीही अडचण नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI