मुळशी पॅटर्न! शेतकरी पुत्राचं वऱ्हाड हेलिकॉप्टरने निघालं

मुळशी पॅटर्न! शेतकरी पुत्राचं वऱ्हाड हेलिकॉप्टरने निघालं

पुणे : प्रत्येक जण लग्न आपापल्या पद्धतीने करतो. कुणी खर्च वाचवतो, तर कुणी अमाप खर्च करतो. लग्न अवीस्मरणीय बनवण्यासाठी अनेक आई-वडील हटके पद्धती अवलंबतात. असाच हटके प्रकार पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत घोड्यावर किंवा सजवलेली चारचाकी, रथावर मिरवणूक काढण्याची पद्धत तुम्ही पाहिली असेल. आता तर चक्क हौशी नवरदेवाने हेलिकॉप्टरमधून वऱ्हाड घेऊन जाण्याची प्रथाच सुरू झाली आहे. मावळ तालुक्यातील डोणे या गावातलं हे लग्न आहे. नवरदेवाने चक्क भाडे तत्वावर हेलिकॉप्टर घेऊन आपले वऱ्हाड नवरीच्या दारी नेलं.

शहरी तसेच ग्रामीण भागात लाखो रूपये खर्च करून थाटात विवाह सोहळा पार पाडणे काही नवीन नाही. गावाकडील काही हौसी नवरदेव आता विवाहस्थळी जाण्यासाठी हेलिकॉप्टरच बूक करू लागलेले दिसतात. मावळातील डोणे येथील  नवरदेवाने 8 मे रोजी साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी शिवपार्वती लॉन  हिंजवडी पुणे येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला. डोणे गावातील शेतकरी कुंटुबातल्या नवरदेवाचे नाव अशोक वाडेकर असे आहे. केवळ दिवंगत वडिलांची इच्छा असल्यानेच लग्नात हेलिकॉप्टर आणल्याची माहिती नवरदेवाने दिली.

घोटावडे मुळशी येथील काळुराम देवकर यांची मुलगी पुजा हिच्याशी होणाऱ्या लग्नासाठी वाडेकर कुटुंबीयांनी पुणे येथील एका कंपनीचे हेलिकॉप्टर 75 हजार रूपये प्रतितास दराने भाडेतत्वार घेतलं. हेलिकॉप्टर सकाळी दहा वाजता मावळ तालुक्यातील छोट्याशा डोणे गावात पोहोचलं. हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही तर आपल्या घराच्या छतावरही थांबले होते.

अकरा वाजण्याच्या सुमारास डोणे गावातून वाजत गाजत शाही थाटात नवरदेवाची वरात काढण्यात आली. अवघ्या मिनिटातच नवरदेव नातेवाईकांसोबत हॅलिकॉप्टरमध्ये बसून नवरी आणण्यासाठी आकाशात उडाला. छोट्याशा खेडेगावात रंगलेल्या या शाही विवाह सोहळ्याची तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती.

Published On - 4:28 pm, Thu, 9 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI