“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिरागवर संशय” मांझींच्या पक्षाचं पंतप्रधानांना पत्र

हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिजवान यांनी रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे

पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिरागवर संशय मांझींच्या पक्षाचं पंतप्रधानांना पत्र
| Updated on: Nov 02, 2020 | 1:08 PM

पाटणा : लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान आहे, त्यांचे पुत्र चिराग पासवान यांचे वर्तन संशयास्पद आहे, असा सनसनाटी आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाने केला आहे. ( Hindustani Awam Morcha writes to PM demanding probe into Ram Vilas Paswan death suspecting son Chirag Paswan)

हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश रिजवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दानिश यांनी मोदींकडे रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“पासवान यांच्या चितेचा अग्नी शमला नव्हता, तोच चिराग पासवान यांनी एका शूटिंगमध्ये राक्षसी हास्य करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात उपचार सुरु असताना पासवान यांच्या भेटीची केवळ तिघांनाच परवानगी का होती? रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे चिराग पासवान यांनी कट रचला आहे, त्यांची भूमिका संशयास्पद आहे” असा आरोप दानिश रिजवान यांनी केला.

याआधी, रामविलास पासवान यांच्या निधनावर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनीही रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. “पासवान हे एक मोठे नेते होते आणि अशा परिस्थितीत त्यांचे वैद्यकीय बुलेटिन का जारी केले नाही?” असा सवाल जीतनराम मांझी यांनी विचारला.

जीतनराम मांझी यांच्या प्रश्नांना उत्तर देताना चिराग पासवान म्हणाले “जर माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल काही शंका असेल तर ते थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न का विचारत नाहीत? ते दररोज फोन करुन माझ्या वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे”

रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी जीतनराम मांझी यांनी केली होती. मांझी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीले आहे.

राम विलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

Ram vilas Paswan | अनंत आठवणींसह कोट्यवधींचा वारसा, रामविलास पासवान यांची संपत्ती किती?

रामविलास पासवान यांना भारतरत्न द्या, राष्ट्रपतींना पत्र

(Hindustani Awam Morcha writes to PM demanding probe into Ram Vilas Paswan death suspecting son Chirag Paswan)