हुबळी स्टेशनवर स्फोट, संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

| Updated on: Oct 22, 2019 | 11:39 AM

हुबळी रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंचा शोध घेताना एका बकेटवर कोल्हापूरमधील राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आढळून आलं.

हुबळी स्टेशनवर स्फोट, संशयित पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव
Follow us on

बेळगाव : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात झालेल्या स्फोटात (Hubli Railway Station Blast) तरुण गंभीर जखमी झाला आहे. संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदाराचं नाव आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पार्सलवर नाव असलेले प्रकाश आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

हुबळी रेल्वे स्थानकावर काल (सोमवारी) झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा प्रकारचं पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे आल्याची माहिती आहे.

स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेत आणखी आठ स्फोटक वस्तू आढळून आल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

विजयवाडा वास्को मार्गावर धावणाऱ्या अमरावती एक्स्प्रेसमध्ये रिकाम्या डब्यात रेल्वे स्थानकावरील चहा विक्रेता हुसेनसाब याला एक पार्सल आढळून आलं. त्याने ते पार्सल स्टेशन मास्टर केबिनमध्ये नेलं. पार्सलमध्ये लिंबूसदृश वस्तू होत्या. रेल्वे सुरक्षा रक्षकांनी पार्सल घडण्याची सूचना हुसेनसाबला दिली. मात्र पार्सल उघडताच त्याचा स्फोट झाला.

स्फोटात हुसेनसाबच्या हाताला जखम झाली तर केबिनच्या काचांचा चक्काचूर झाला. काचेचे तुकडे स्थानकावर पसरले. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी हुसेनसाबला तातडीने किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

स्फोटाच्या आवाजामुळे (Hubli Railway Station Blast) रेल्वे स्थानकावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. रेल्वे पोलिस आणि शहर पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानकावर धाव घेतली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं होतं. रेल्वे स्थानकाला पोलिसांनी वेढा घालून व्यापक शोधमोहीम हाती घेतली, त्यात आणखी आठ स्फोटकं आढळून आली.

रेल्वे स्थानकावर अमरावती एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांमध्ये आणखी स्फोटकं आहेत का, याचा तपास पोलिसांनी सुरु केला. स्फोट नेमका कोणत्या वस्तू किंवा रसायनांमुळे घडला याचाही तपास सुरु करण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथक आणि संगणकाच्या सहाय्याने शोधकार्य सुरु आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याची सूचना प्रवाशांना करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकावर संशयित वस्तूंचा शोध घेताना आणखी काही बकेट रुपातील पार्सल सापडल्या. एका बकेटवर कोल्हापूरमधील राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आढळून आलं. बकेटवरील नावामुळे यादृष्टीने चौकशी होणार असल्याचं समजतं.