इचलकरंजीत कर्जाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर गुन्हा, दोघांना अटक

| Updated on: Jun 29, 2020 | 3:46 PM

इचलकरंजी शहरात गोरगरीब महिलांना कर्जाचे आमिष दाखवून महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांचा गैरवापर करत संगनमातने फसवणूक केल्याचा आरोप या एजंटवर आहे.

इचलकरंजीत कर्जाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक, फायनान्स कंपनीच्या एजंटसह तिघांवर गुन्हा, दोघांना अटक
Follow us on

कोल्हापूर : फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या एजंटसह (Ichalkaranji Fraud Case) तिघांवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इचलकरंजी शहरात गोरगरीब महिलांना कर्जाचे आमिष दाखवून महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांचा गैरवापर करत संगनमातने फसवणूक केल्याचा आरोप या एजंटवर आहे. या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय रामचंद्र कलबुर्गी (वय 43) आणि अवधुत दिलीप शिंदे (वय 20) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. याप्रकरणी रुपाली सुनिल गजरे यांनी तक्रार केली (Ichalkaranji Fraud Case) आहे.

सागर सत्यनारायण मोदाणी (वय 35), संजय कलबुर्गी आणि अवधुत शिंदे या तिघांनी हुपरी इथे राहणार्‍या रुपाली गजरे आणि त्यांचा सोबतच्या महिलांना फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगून संपर्क साधला. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडील पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचं पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन महात्मा गांधी पुतळाजवळील न्यु फ्रेंड मोबाईल शॉपीमध्ये बोलावलं.

यावेळी संशयित तिघांनी गजरे यांची कागदपत्रे स्कॅन करुन मोबाईलचा रिकामा बॉक्स गीता मानसिंग माने, उषा वंसत जाधव, सुमन विश्‍वास माने यांच्या हातात देवून त्यांचे फोटो काढले. सदरचे फोटो कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांना घरी जाण्यास सांगून चार दिवसांनी तुमचं कर्ज मंजूर होईल, असे सांगितले. नंतर महिलांनी चौकशी केली. मात्र, तुमचे कर्ज मंजूर झाले नाही, असे त्यांना सांगण्यात आले (Ichalkaranji Fraud Case).

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर फायनान्स कंपनीचे लोक हप्ता वसुलीसाठी घरी आले. तेव्हा या महिलांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या महिलांची घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या संपर्कातील एका महिलेने त्यांना बचत गट स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनीकडून प्रत्येकी 90 हजाराचे कर्ज देईल, असे सांगून ह्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर मोदाणी याने सांगितलं. त्याप्रमाणे महिलांनी 10 महिलांची कागदपत्रे मोदाणी यांच्याकडे दिली.

सद्यस्थितीला त्यातील 3 जणांच्या तक्रारी समोर आल्या असून आणखी तक्रारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयित आरोपींची टोळी असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने इचलकरंजी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनेच्या मुळाशी जावून कसून तपास कारणार असल्याचे सांगितले आहे (Ichalkaranji Fraud Case).

संबंधित बातम्या : 

माहेरी गेलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर पाहून संताप, तीन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या

अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू

Baramati Crime | बारामतीत चालकासह ट्रक पळवला, साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी, 7 जणांना अटक