सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली, पाकिस्तानही आपल्या पुढे

सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली, पाकिस्तानही आपल्या पुढे

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या Worlds Happiest Countries Report मध्ये भारताची 140 व्या स्थानावर घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची सात स्थानांनी घसरण झाली आहे. 156 देशांच्या या यादीत नेहमीप्रमाणे फिनलँड सर्वात आनंदी देशांच्या यादीत यावर्षीही अव्वल क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास सोल्युशनकडून हा अहवाल जारी करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये 20 मार्च हा वर्ल्ड हॅप्पीनेस डे म्हणून घोषित केला होता.

संयुक्त राष्ट्राची ही सूची सहा निकषांवर निश्चित केली जाते. यामध्ये वय, देशातील लोकांचं स्वास्थ्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या गोष्टींचा समावेश असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सरासरी आनंदी आकडेवारीमध्ये घट झाली आहे. यात भारताचीही रँक घसरली आहे. 2018 मध्ये भारत या यादीत 133 व्या क्रमांकावर होता, तर यावेळी 140 वा क्रमांक आहे.

संयुक्त राष्ट्राचा हा सातवा अहवाल आहे. देशातील लोक स्वतःला त्यांच्या देशात किती सुखी समजतात यावर हा अहवाल तयार केला जातो. विशेष म्हणजे लोकांची चिंता, उदासपणा आणि रागासह नकारात्मक भावनांमध्ये वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलंय. आर्थिक महसत्ता असलेल्या अमेरिकेचीही रँक या अहवालात घसरली आहे.

फिनलँडने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल राहण्याचा मान मिळवला. यानंतर डेनमार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडचा क्रमांक लागतो. या रिपोर्टनुसार पाकिस्तान 67, बांगलादेश 125 आणि चीन 93 व्या स्थानावर आहे. म्हणजेच पाकिस्तान सुखी देशांच्या बाबतीत चीनच्याही पुढे आहे.

युद्धग्रस्त सुदानमधील लोक त्यांच्या जीवनाविषयी सर्वात जास्त दुःखी आहेत. यानंतर मध्य आफ्रिका (155), अफगाणिस्तान (154), तंजानिया (153) आणि रवांडा (152) यांचा क्रमांक लागतो. जगातील सर्वात श्रीमंत देश लक्झमबर्ग या यादीत 14 व्या क्रमांकावर आहे.

यादीतील पहिले 25 देश

 1. फिनलँड
 2. डेनमार्क
 3. नॉर्वे
 4. आईसलँड
 5. नेदरलँड
 6. स्वित्झर्लंड
 7. स्वीडन
 8. न्यूझीलंड
 9. कॅनडा
 10. ऑस्ट्रिया
 11. ऑस्ट्रेलिया
 12. कोस्टारिका
 13. इस्रायल
 14. लक्झमबर्ग
 15. ब्रिटन
 16. आयर्लंड
 17. जर्मनी
 18. बेल्जियम
 19. अमेरिका
 20. शेच रिपब्लिक
 21. संयुक्त अरब अमिराती
 22. माल्टा
 23. मेक्सिको
 24. फ्रान्स
 25. चीनचा तैवान प्रांत

Published On - 11:41 pm, Wed, 20 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI