कठुआ बलात्कार-हत्या : तिघांना जन्मठेप, 3 पोलिसांना 5 वर्षांची शिक्षा

| Updated on: Jun 10, 2019 | 5:27 PM

देशाला हादरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या कठुआ गावातील आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीन दोषींना जन्मठेप आणि तीन दोषी पोलिसांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कठुआ बलात्कार-हत्या : तिघांना जन्मठेप, 3 पोलिसांना 5 वर्षांची शिक्षा
Follow us on

पठाणकोट : देशाला हादरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या कठुआ गावातील आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी तीन दोषींना जन्मठेप आणि तीन दोषी पोलिसांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट न्यायालयाने हा निर्णय दिला. याप्रकरणी कोर्टाने आजच सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं. कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी इन कॅमेरा सुनावणी 3 जूनलाच पूर्ण झाली होती. मात्र त्यादिवशी न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज 10 जूनला याबाबत अंतिम सुनावणी होईल असे सांगितले होते. अंतिम सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या बाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यानंतर पठाणकोट विशेष न्यायालयाने सात आरोपींपैकी सहा जणांना दोषी ठरवलं. तर एकाची निर्दोष मुक्तता केली.

दोषी आरोपी गावाचे प्रमुख सांजी राम (मुख्य आरोपी), स्पेशल पोलिस ऑफिसर दीपक खजुरिया आणि परवेश कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. शिवाय कोर्टाने त्यांच्यावर एक-एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तर पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या पोलिसांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.


दोषींमध्ये गावाचे प्रमुख सांजी राम (मुख्य आरोपी), स्पेशल पोलिस ऑफिसर दीपक खजुरिया,  सुरेंद्र वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता आणि प्रवेश  या सहा जणांचा समावेश आहे. तर प्रमुख आरोपी सांजी रामचा मुलगा विशाल याची निर्दोष मुक्तता केली आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात याबाबत सुनावणी सुरु करण्यात आली. या प्रकरणी न्यायलयात इन कॅमेरा चौकशी करण्यात आली. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेल्या या प्रकरणातील आरोपींना सोमवारी (10 जून) सकाळी न्यायलयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायधीशांनी न्यायलयात प्रत्येक आरोपीच्या दोषारोपत्र वाचून दाखवले. त्यानंतर न्यायालयाने सांझी राम, प्रवेश कुमार, दीपक खजुरिया या तिघांना कलम 302 (खून), कलम 376 (बलात्कार), कलम 120 B (कट रचणे), कलम 363 (अपहरण) या कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. तर पोलीस अधिकारी आनंद दत्ता, सुरेंद्र कुमार, तिलक राज यांना कलम  201 (पुरावे नष्ट करणे) या अंतर्गत दोषी ठरवलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

गेल्यावर्षी 10 जानेवारीला जम्मू काश्मीरच्या कठुआ गावातून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. घराजवळच्या जंगलात खेचर चारण्यासाठी गेलेल्या मुलीचे एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केले आणि त्यानंतर तिला जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. यानंतर तब्बल सात ते आठ दिवस आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली.

दोन दिवस मुलीची शोधाशोध करुन थकलेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी (12 जानेवारी) पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार केली. या प्रकरणानंतर तब्बल पाच दिवसांनी (17 जानेवारी) त्या मुलीचा वाईट अवस्थेत मृतदेह झाडांत आढळून आला. तिच्या शरीरावर व्रण होते. तिला मारहाण केल्याच्या खुणाही तिच्या शरिरावर होत्या.

यानंतर जम्मू काश्मीरच्या कठुआ गावात आठ वर्षाच्या मुलींवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या खूनाप्रकरणी माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मात्र त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.  त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली.  या प्रकरणानंतर सर्व देशभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि फाशी द्यावी अशी मागणी करण्यासाठी देशभरातून अनेक कँडल मार्च काढण्यात आले.