लातूरच्या लेकाचा डंका, सौरभ अंबुरेंना पहिलं राफेल उडवण्याचा मान

| Updated on: Oct 15, 2019 | 11:46 AM

शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये बसून लातूरचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांनी जुलै महिन्यातच पहिल्यांदा झेप घेतली होती.

लातूरच्या लेकाचा डंका, सौरभ अंबुरेंना पहिलं राफेल उडवण्याचा मान
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रासह मराठवाडयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पहिलं राफेल विमान उडवण्याचा मान लातूरच्या मराठमोळ्या पठ्ठ्याला मिळाला आहे. उदगीरचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांनी (Sourabh Ambure flew rafale) ऐतिहासिक गगनभरारी घेतली.

सौरभ अंबुरे यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानातून गगनभरारी घेत पहिलं राफेल विमान उडवलं. वायुसेनेने फोटो शेअर केला असून यामध्ये सौरभ अंबुरे राफेल विमानासोबत दिसत आहेत. राफेल हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी झाल्याने भारताची ताकद आणखीन वाढली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल विमान भारताच्या ताब्यात मिळालं. शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये बसून अंबुरे यांनी जुलै महिन्यातच पहिल्यांदा झेप घेतली होती. भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या युद्धाभ्यासावेळी लढाऊ विमान अंबुरे (Sourabh Ambure flew rafale) यांनी उडवलं.

फ्रान्सने बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत RB 001 राफेल (Rafale combat jet) हे विमान भारताला सोपवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून पहिली भरारी घेतली.

दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा असल्यामुळे राजनाथ सिंह यांनी लढाऊ विमानाची पूजा केली. राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्येही भारतीय परंपरा दाखवत, राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवत विमानावर ओम काढलं. मात्र यामुळे राजनाथ यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं.

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून वैज्ञानिक प्रगतीचा अवमान, ‘अंनिस’कडून निषेध

राफेल विमान

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीन चीट दिली.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?

भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती.