नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जशोदाबेन आणि ममता बॅनर्जींची भेट

| Updated on: Sep 18, 2019 | 12:45 PM

जशोदाबेन झारखंडच्या धनबाद येथून परत येत होत्या, तर ममता बॅनर्जी दिल्लीला निघाल्या होत्या. त्यावेळी कोलकाता विमानतळावर दोघींची अचानक भेट झाली.

नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जशोदाबेन आणि ममता बॅनर्जींची भेट
Follow us on

कोलकाता : राजकारणातील ‘दीदी’ आणि राजकारणातील ‘दादा’ माणसाच्या पत्नीची मंगळवारी कोलकात्यात अचानक भेट झाली. या दोघी म्हणजे, दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नसून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन (Mamata Banerjee meets Jashodaben) आहेत.

जशोदाबेन आणि ममता बॅनर्जी यांच्या अनपेक्षित भेटीचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आणि चर्चांना उधाण आलं. कोलकाता विमानतळावर मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच या दोघींची भेट झाली.

जशोदाबेन झारखंडच्या धनबाद येथून परत येत होत्या, तर ममता बॅनर्जी दिल्लीला निघाल्या होत्या. जशोदाबेन यांना विमानतळावर पाहताच ममता बॅनर्जी त्यांची भेट घेण्यासाठी (Mamata Banerjee meets Jashodaben) धावत गेल्या. काही मिनिटांच्या या भेटीमध्ये ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांनी गप्पा मारल्या. ममता बॅनर्जींनी जशोदाबेन यांना एक साडीही भेट दिली.

पाच वर्षात नरेंद्र मोदींचं उत्पन्न दुप्पट, पत्नी जशोदाबेन यांची संपत्ती किती?

जशोदाबेन या पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील आसनसोलमध्ये असलेल्या कल्याणेश्वरी मंदिरात निघाल्या होत्या. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पूजा केल्याचं म्हटलं जातं.

विशेष म्हणजे जशोदाबेन पश्चिम बंगालमध्ये येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनाही नव्हती. मात्र राज्य प्रशासनाला याची माहिती असल्यामुळेच कल्याणेश्वरी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ममता बॅनर्जी आज (बुधवारी) नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमधील निधीबाबत त्या पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. बॅनर्जींनी मंगळवारी मोदींना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहित असल्याचा उल्लेख करत रकान्यात जशोदाबेन यांचं नाव लिहिलं होतं. त्यानंतर जशोदाबेन यांच्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या. खुद्द जशोदाबेन यांनीही नरेंद्र मोदी आपले ‘राम’ असल्याचा उल्लेख केला होता. इतकंच काय, तर गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मोदी अविवाहित असल्याचा दावा केल्यानंतर जशोदाबेन यांनी तो खोडून काढला होता.

जशोदाबेन या नरेंद्र मोदींपासून दीर्घ काळापासून विभक्त राहत आहेत. मात्र ते एकमेकांना पती-पत्नी मानत असल्याचं दिसतं.