ईडीची ‘100 कोटी वसुलीची नोटीस’, अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

ईडीची '100 कोटी वसुलीची नोटीस', अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले
ईडीची '100 कोटी वसुलीची नोटीस', अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले


मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यादरम्यान अनिल परब यांनी संध्याकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. पण या विषयावर जास्त न बोलता ते निघून गेले.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

“आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

अनिल परब नेमकं काय म्हणाले ते व्हिडीओत बघा :

संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले ?

” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

राणे कनेक्शनमुळे परबांना ईडी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. याच मुद्द्याला घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शनं तसेच आंदोलनं केली जात होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य रंगलं. यामध्ये परब पोलिसांना सूचना देत असल्याचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला होता. परबांच्या या व्हिडीओच्या आधावरच भाजपने त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. तसेच आम्ही या सर्व गोष्टींचा रितसर बदला घेऊ असं राणे बंधू यांनी सूचक विधान केलेलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता परब यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नारायण राणे यांना अटक होण्यामागे परबांची मोठी भूमिका असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली नाही ना ? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

किरीट सोमय्या अनिल परब यांच्या मागे का लागले ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांना यापूर्वी लक्ष्य केलेलं आहे. त्यांनी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत. सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्चून अनिल परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुली प्रकरण समोर आल्यानंतरही पुढचा नंबर हा अनिल परब यांचाच आहे, असे सोमय्या वेळोवेळी सांगत आलेले आहेत. तसेच परिवहन विभागातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या तसेच भाजपने केलेला आहे.

हेही वाचा :

अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात

हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI