हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (anil parab should face ed enquiry, says nitesh rane)

हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान
अनिल परब, नितेश राणे

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांच्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंमत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा. आपली बाजू मांडा. स्वच्छ असेल तर ईडी कारवाई करणार नाही. घाबरण्याचं कारण नाही, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे. (anil parab should face ed enquiry, says nitesh rane)

नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हतं ना… नोटीसच मिळणार होती… आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचं सिद्ध करावं, असं राणे यांनी म्हटलं आहे.

राऊतांना तमाशा करायची गरज नाही

परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांना काय वाटायचं ते वाटू दे. शेवटी त्यांना काही तरी वाटावंच लागेल ना. परब काही एकट्यासाठी पैसे जमा करायचे नाहीत. ते मातोश्रीचे परिवार मंत्री आहेत. थोडं परिवाराला द्यायचं आणि थोडं स्वत:ला ठेवयाचं हेच त्यांनी केलं. त्यामुळे राऊतांना काय बोलायचं ते बोलू द्या, असं ते म्हणाले. परबांनी काय केलं नसेल तर राऊतांना तमाशा करायची गरज नाही. त्यांना जाऊ द्या ना ईडीकडे. निर्दोष असतील तर काय घाबरायचं?, असा सवालही त्यांनी केला.

नोटीस कशाबद्दल माहीत नाही

नोटीस कशाबद्दल आहे हे मला माहीत नाही. कदाचित आरटीओमधील भ्रष्टाचार किंवा सचिन वाझेने ज्या पद्धतीने 100 कोटींच्या वसुलीत नावं घेतली आहेत. त्याची ईडीने चौकशी केली असेल आणि त्याबाबत त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी नोटीस दिली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

घरच्या हल्ल्यांचा हिशोब वेगळा होईल

घरच्या हल्ल्याचे परिणाम वेगळे होतील. हे प्रकरण वेगळं आहे. त्यांनी जो भ्रष्टाचार केला होता, त्याचं हे प्रकरण आहे. ईडी आणि सीबीआय हे वेगळ्या पद्धतीने कारवाई करतात. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. घरच्या हल्ल्याचा हिशोब वेगळा होणार. तो योग्यवेळी होणार. उद्धव ठाकरे मुलांशिवाय आणि नातेवाईकांशिवाय कुणाचे झाले नाहीत. आपल्या मुलासाठी उद्धव ठाकरे कसे पळत होते. आता परबसाठी यावं पुढे. आता कळेल उद्धव ठाकरे केवळ कुटुंबाचेच आहेत म्हणून, असंही त्यांनी सांगितलं.

राजकीय पक्षाचं कवच घेण्याचं कारण नाही

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीला कायद्याने अधिकार दिला आहे. त्यांच्याकडे काही तक्रार असेल. सचिन वाझे प्रकरणात काही माहिती असेल त्यामुळे ईडी चौकशी करत असावी. ईडी जर चौकशी करणार असेल आणि आपला काही दोष नसेल तर या देशात कुणाचंही सरकार असलं तरी सूडाचं राजकारण करता येत नाही हे आपण परवा पाहिलं आहे. परवा नारायण राणेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. लगेच जामीन मिळाला, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दोषी असो किंवा नसो राजकीय पक्षाचं विमा कवच घेण्याचं कारण नाही. राजकीय पक्ष म्हणजे काही सेक्युरीटी नाही. तुम्ही नेता आहात म्हणून तुम्ही काहीही कराल असा कायदा यांच्यासाठी दुर्देवाने देशाने केला नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

मग कोर्टाला क्रोनोलॉजी समजून सांगा

या प्रकरणात जर शिवसेनेला काही क्रोनॉलॉजी समजली आहे. तर ती हायकोर्टाला समजून सांगा. कोर्ट ईडीवर ताशेरे ओढेल. क्रोनॉलॉजी समजली आहे तर कोर्टात जाता येतं ना. तुम्हाला कोणी थांबवलं आहे, असं सांगतानाच नारायण राणेच्या प्रकरणात संबंध जोडायचा तर नाशिकचे पोलीस कमिशनर दीपक पांड्ये यांचा जोडला पाहिजे. गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटलांचा जोडला पाहिजे. चोर के दाढी में तिनका आहे. या संपूर्ण प्रकरणात वळसे-पाटील नामधारी गृहमंत्री होते. कार्यकारी गृहमंत्री कोण होतं हे त्या क्लिपमध्ये सर्वांनी पाहिलं, असंही त्यांनी सांगितलं. (anil parab should face ed enquiry, says nitesh rane)

 

संबंधित बातम्या:

Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा; नारायण राणें पहिल्यांदाच म्हणाले…

राज्यात लवकरच मराठी भाषा विद्यापीठ, 10 दिवसांत समिती स्थापन करणार : उदय सामंत

(anil parab should face ed enquiry, says nitesh rane)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI