अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन

| Updated on: Nov 07, 2020 | 7:53 AM

उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र 15 दिवस उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. (Bacchu Kadu on farmer Help Package)

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन
Follow us on

अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या मदतीसाठी विलंब होत असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिली जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले. (Bacchu Kadu on farmer Help Package)

राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली. या नुकसानीच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र 15 दिवस उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

“राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नक्कीच मदत मिळेल. काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे,”असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. “पण दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत मिळेल असे संकेत बच्चू कडूंनी दिल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.”

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करु. सध्या परिस्थिती कठीण, राज्याकडेही पैसा नाही. पण अशा स्थितीतही राज्य शेतकऱ्यांना मदत करत आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे शेतजमीन खरवडून गेली होती. तसेच शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पाण्यात वाहून गेली होती. पुराचे पाणी शिरल्याने विहीर गाळाने भरुन गेल्या होत्या. याशिवाय, पुराचे पाणी घरात शिरल्याने कापून ठेवलेली पिकंही भिजली होती. त्यामुळे अनेक भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठीही वैरण शिल्लक राहिलेली नाही.  (Bacchu Kadu on farmer Help Package)

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा; सदाभाऊ खोत यांचा घणाघात