114 कुत्रे पाळणारा हा सुपरस्टार माहितीये? सर्वात श्रीमंत अभिनेता अन् लक्झरी हॉटेल्सचा मालक
असा एक बॉलिवूड सुपरस्टार ज्याने वेगवेगळ्या घरात 100 हून अधिक कुत्रे पाळले आहेत. या अभिनेत्याने आतापर्यंत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल आहे. या अभिनेत्याची संपत्ती पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.

Mithun Chakraborty has 114 dogsImage Credit source: instagram
बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत असतात. काही जण त्यांच्या अत्यंत महागड्या घरांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत येतात, तर काही जण त्यांच्या खाजगी जेट विमानांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. पण बॉलिवूडचा असा एक सुपरस्टार ज्याच्याकडे तब्बल 114 कुत्रे आहेत. या सुपरस्टारला कुत्रे पाळण्याची आवड आहे आणि त्याच्या दोन वेगवेगळ्या घरात 100 हून अधिक कुत्रे आहेत. एवढंच नाही तर तो एक यशस्वी व्यावसायिकही आहे.
या सुपरस्टारकडे आहेत 114 कुत्रे
हा सुपरस्टार म्हणजे मिथुन चक्रवर्ती. मिथुन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्तीही आहे. मिथुन दा हे संजय दत्त आणि गोविंदा सारख्या स्टार्सपेक्षा श्रीमंत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची एकूण संपत्ती जाणून कोणालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.
मुंबईतील मड आयलंडमध्ये त्यांचे 45 कोटींचे घर
मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे अनेक बंगले आणि हॉटेल आहेत. मुंबईतील मड आयलंडमध्ये त्यांचे 45 कोटींचे घर आहे, ज्यामध्ये त्यांनी 76 कुत्रे पाळले आहेत. या अभिनेत्याने या कुत्र्यांसाठी घरात एक खास स्थान निर्माण केले आहे, जिथे अनेक सुविधा आहेत. हे घर 1.2 एकरमध्ये पसरलेले आहे. उटी येथील त्याच्या बंगल्यात 38 कुत्रे आहेत.
350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम
मिथुन दा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1976 मध्ये त्यांनी ‘मृगया’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मिथुन दा यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. सुमारे 49 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मिथुन दा यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन दा यांची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे.
लक्झरी हॉटेल्स आणि कार
एवढंच नाही तर मिथुन दा यांचे उटी आणि म्हैसूर सारख्या शहरांमध्येही लक्झरी हॉटेल्स आहेत. तसेच ते मोनार्क ग्रुपचे मालकही आहेत. मिथुन दा यांच्याकडे जबरदस्त कार कलेक्शनही पाहायाला मिळतं. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, फोर्ड एंडेव्हर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या लक्झरी कार आहेत.