मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पावसाची शक्यता?

| Updated on: May 29, 2020 | 9:20 AM

30 तारखेपासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. (Monsoon Maharashtra Rain Weather Forecast)

मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पावसाची शक्यता?
Follow us on

पुणे : घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्याचं वातावरण पोषक असल्याने मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 8 जून रोजी राज्याच्या दक्षिण भागात मान्सून प्रवेश करेल आणि 16 तारखेपर्यंत उत्तर भाग व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon Maharashtra Rain Weather Forecast)

29 मे म्हणजे आजपासून राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. 30 तारखेपासून पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. 30 तारखेनंतर मान्सूनपूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी ही माहिती दिली.

पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात घट होणार आहे. पश्‍चिम भागातील हवा वाहू लागल्यानंतर पुण्यातील तापमान 40 अंशाखाली येईल. तर विदर्भातही 30 तारखेपर्यंत तापमान कमी होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 29 आणि 30 तारखेला तापमानाचा पारा खाली येईल.

शुक्रवारी आणि शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, तर 30 तारखेनंतर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

31 मे आणि एक तारखेला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल आणि कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भागात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आहे. (Monsoon Maharashtra Rain Weather Forecast)

पुणे आणि जिल्ह्यात 30 तारखेला दुपारनंतर विजांचा कडकडाट सुरु होईल. 30 तारखेनंतर पावसाला सुरुवात होईल. 31 मे आणि एक ते दोन जून रोजी पुण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. 55 ते 64 मिलिमीटर एवढा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होणार आहे. वाऱ्यामुळे झाडेही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.