फ्लॅट आणि 15 लाख रुपयांसाठी आईचा मुलाच्या अपहरणाचा बनाव

फ्लॅट आणि 15 लाख रुपयांसाठी आईचा मुलाच्या अपहरणाचा बनाव


पुणे : हडपसरमध्ये एका महिलेने पतीकडून एक फ्लॅट आणि 15 लाख रुपये घेण्याच्या हव्यासापोटी स्वतःच्या 4 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हडपसर पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला. पोलिसांनी या प्रकरणी आईसोबत तिला मदत करणाऱ्या 2 साथीदारांना अटक केली आहे. आर्यन चांगदेव जगताप असे अपहरण केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता जगताप (शुभ ग्लोरिया सोसायटी, मांजरी बुद्रुक) यांनी शेवाळवाडी येथील इमारतीच्या पार्किंगमधून आपल्या 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार केली. तसेच अपहरणकर्ते पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आल्याचेही तक्रारीत सांगितले. यानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपास अधिकारी संजय चव्हाण आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत मुलाचे अपहरण त्याच्या आईनेच केल्याचे उघड केले.

आरोपी संगिता जगताप यांचे दुसरे लग्न झाले आहे. त्यांच्या आधीच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी चांगदेव जगताप यांच्याशी दुसरा विवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर जगताप यांना आर्यन नावाचा मुलगा झाला. दरम्यान, संगिता यांचा डोळा जगताप यांच्या संपत्तीवर पडला आणि त्यांनी आपल्याच मुलाचे अपहरण करण्याचा डाव आखला.

आरोपी संगिता जगतापने मुलगा आर्यनचे अपहरण केले आणि 28 एप्रिल रोजी अपहरणाची तक्रार दिली. त्यानंतर तिने याची माहिती पतीलाही दिली. तसेच अन्य साथीदारांकडून पतीकडे एका फ्लॅटची आणि 15 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांनी तपासात अपहरणासाठी वापरलेल्या गाडीची माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या संगिताने साथीदार अभिजीत अशोक कड आणि संगिता गणेश बारड यांना मुलाला सोडून देण्यास सांगितले. मुलाला सोडल्यानंतर दोघेही साथीदार पसार झाले. मात्र, पोलिसांनी तपास करुन दोघांच्याही मुसक्या आवळल्या.