दिवाळीत आई-बहिणींकडून ऑनलाईन औक्षण, नाशिकचे शहीद जवान नितीन भालेरावांचा डोळे पाणावणारा व्हिडीओ

| Updated on: Nov 29, 2020 | 6:34 PM

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात कोब्रा 206 बटालियनचे सहाय्यक कमांडर नितीन भालेराव शहीद झाले

दिवाळीत आई-बहिणींकडून ऑनलाईन औक्षण, नाशिकचे शहीद जवान नितीन भालेरावांचा डोळे पाणावणारा व्हिडीओ
Follow us on

नाशिक : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवून आलेल्या IED स्फोटात सीआरपीएफचे अधिकारी असलेले नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव (Assistant Commandant Nitin Purushottam Bhalerao) शहीद झाले. दिवाळीत घरी येऊ न शकल्यामुळे भालेराव यांनी ऑनलाईन दिवाळी साजरी केली होती. व्हॉट्सअप कॉलवरुन औक्षण झालेल्या भालेराव यांचा ‘तो’ व्हिडीओ पाहून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. (Nashik CRPF Cobra commando Nitin Bhalerao martyred in Maoist attack in Chhattisgarh)

शहीद जवान नितीन भालेराव हे दिवाळीनिमित्त सुट्टीवर आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मातोश्री आणि बहिणींनी ऑनलाईन दिवाळी साजरी केली होती. नितीन भालेराव यांना व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल करुन ओवाळलं होतं. नाशिकच्या राजीव नगर भागात शहीद नितीन भालेराव यांचे कुटुंबीय वास्तव्याला आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. नितीन हे 8 ते 10 वर्षांपासून सेवेत होते.

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला परिसरात माओवाद्यांनी रात्री दोन आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोब्रा 206 बटालियनचे सहाय्यक कमांडर नितीन भालेराव शहीद झाले. या स्फोटात सीआरपीएफचे 10 जवान जखमी झाले असून चौघा जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना रात्रीच रायपूरला एअरलिफ्ट करण्यात आलं होतं.

नितीन भालेराव यांच्यासह एक अधिकारी आणि 9 जवान जखमी झाले. नितीन भालेराव यांना अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर अन्य जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(Nashik CRPF Cobra commando Nitin Bhalerao martyred in Maoist attack in Chhattisgarh)

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून शहीद भालेराव यांना श्रद्धांजली

नाशिकचे सुपुत्र सहाय्यक कमांडंट नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये शहीद झाले. त्यांच्या कंपनी कमांडरशी आपलं बोलणं झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. शहीद नितीन भालेराव यांचं पार्थिव रायपूरवरुन विमानाने मुंबईत आणलं जाईल. तिथून ते नाशिकला येईल. त्यानंतर नातेवाईक यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. देशासाठी बलिदान देणाऱ्या नाशिकच्या वीर योद्ध्याला मन:पूर्वक श्रद्धांजली, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद नितीन भालेराव यांना आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या :

नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव यांना वीरमरण, छत्तीसगडमध्ये नक्षल्यांनी घडवलेल्या IED स्फोटात शहीद

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील

(Nashik CRPF Cobra commando Nitin Bhalerao martyred in Maoist attack in Chhattisgarh)