अण्वस्त्रांच्या धमक्या देणाऱ्या किम जोंग-उनच्या देशात भीषण दुष्काळ, नागरिकांची उपासमार

अण्वस्त्रांच्या धमक्या देणाऱ्या किम जोंग-उनच्या देशात भीषण दुष्काळ, नागरिकांची उपासमार

सियोल : उत्तर कोरियामध्ये जवळपास चार दशकांमधील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. याठिकाणी खाद्यपदार्थांचीही कमतरता आहे. उत्तर कोरियाची अधिकृत ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ने बुधवारी (15 मे) याबाबतची माहिती दिली. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये उत्तर कोरियामध्ये सरासरी 54.4 मिलीमीटर पाऊस पडला. 1982 नंतर यावेळी येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सी’ने दिली. 1982 मध्ये याच काळात जवळपास 51.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

उत्तर कोरियामध्ये खाद्यपदार्थांचीही भीषण टंचाई आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न संस्थेने याबाबतची माहिती दिली. उत्तर कोरियामध्ये जवळपास एक कोटी लोक उपासमारीने ग्रस्त आहेत. या विषयी संयुक्त राष्ट्रात उत्तर कोरियन राजदूत किम सोंगने फेब्रुवारी महिन्यात खाद्यपदार्थांचा साठा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतरही उत्तर कोरियातील जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने जगभरातील देशांना उत्तर कोरियाची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

उत्तर कोरियात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला, त्यामुळे येथे खाद्यपदार्थांची टंचाई निर्माण झाली आहे. त्याशिवाय या परिस्थितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लादण्यात आलेले आर्थिक निर्बंध जबाबदार असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला.

उत्तर कोरियाने गेल्या काही वर्षांत आण्विक आणि क्षेपणास्त्रांचा प्रयोग केला. यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक निर्बंध लादण्यात आले. आर्थिक नियमही कठोर करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र विश्व खाद्य कार्यक्रमाचे (डब्ल्यूएफपी) प्रमुख डेव्हिड बिसले यांनी या समस्येला सोडवण्यासाठी उत्तर कोरियाला आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. जेणेकरुन उत्तर कोरियाच्या पिडीतांना मदत मिळू शकेल. डब्ल्यूएफपीच्या रिपोर्टनुसार, सध्या उत्तर कोरियामध्ये एक कोटी लोक जे उत्तर कोरियाच्या लोकसंख्येच्या एकूण 40 टक्के आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI