Parkinsons Day : कंपवाताच्या रुग्णांनी ‘कोरोना’ प्रादुर्भावापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

| Updated on: Apr 12, 2020 | 7:53 PM

पार्किन्सनच्या रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते त्यामुळे ते कोरोना संक्रमणाला जास्त प्रवण (हाय रिस्क) असतात (Parkinson Patients Tips during COVID19 corona virus epidemic)

Parkinsons Day : कंपवाताच्या रुग्णांनी कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?
Follow us on

मुंबई : जगभर 11 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पार्किन्सन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पार्किन्सन्स म्हणजेच कंपवात- मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा आणि एक वाढत जाणारा आजार. सध्या ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता कंपवाताच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी, हे पाहणं महत्त्वाचे आहे. (Parkinson Patients Tips during COVID19 corona virus epidemic)

कोविड 19 चे संक्रमण कोरोनाच्या विषाणूमुळे होते. रुग्ण बोलल्यावर, खोकल्यावर किंवा शिंकल्यावर याचे विषाणू हवेत तरंगतात आणि ते हवेत काही तास तिथेच राहू शकतात. जर हे विषाणू तुमच्या श्वासाद्वारे शरीरात गेले तर तुम्हाला कोविड 19 हा आजार होण्याची शक्यता आहे.

पार्किन्सनचा काय संबंध?

पार्किन्सनमुळे व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृती अशा गोष्टींवर परिणाम दिसून येतो! पार्किन्सनच्या रुग्णांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते आणि त्यांचे श्वसनाचे स्नायू आणि घशाचे स्नायू यामध्ये कडकपणा असतो. त्यामुळे ते या संक्रमणाला जास्त प्रवण (हाय रिस्क) असतात आणि पार्किन्सनच्या रुग्णांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यांना श्वसनासंबंधीच्या समस्या लगेच दिसू शकतात आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागू शकते. त्यामुळे पार्किन्सन रुग्णांनी खूप काळजी घ्यायला हवी.

पार्किन्सनच्या रुग्णांना ‘कोविड 19’ प्रादुर्भावाचा काळात सुरक्षेच्या टिप्स

• शक्यतो तुम्ही घराबाहेर पडू नका, जितकं तुम्ही घरी राहाल, तितकं तुमचा या संसर्गापासून बचाव होऊ शकेल.
• अगदीच गरज असेल, तरच बाहेर पडा आणि बाहेर पडायच्या आधी मास्क लावा, बाहेरुन आल्यानंतर 20 सेकंद साबणाने आपले हात चोळून धुवा, बाहेरुन आणलेल्या कोणत्याही वस्तूला लगेच हात लावू नका, हात धुवून घ्या आणि ती वस्तू थोडा वेळ तशीच ठेवा. त्या सॅनिटाईज करुन मगच ती वस्तू वापरायला घ्या.
• जर तुमच्या घरात तरुण मंडळी असतील आणि ती बाहेर जात असतील तर त्यांपासून लांब राहा किंवा तुम्ही घरातही मास्क लावून राहू शकता. गरज पडल्यास तुम्ही स्वत:ला आयसोलेट (विलगीकरण) केलं तरी चालेल.
• या काळामध्ये तुम्ही तुमची पार्किन्सनची औषधे तशीच सुरु ठेवली पाहिजेत जशी तुम्ही आधी घेत होता.
• औषधे मुबलक आहेत की नाही याची खात्री करुन घ्या, कारण हा लॉकडाऊन कदाचित आणखी काही काळ चालेल. औषधांचा पुरेसा साठा तुमच्याकडे ठेवा म्हणजे तुटवडा झाला तरी तुमचे औषध थांबणार नाही.
• घरी जेवढा जमेल तेवढा व्यायाम करा, बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. व्यायामामध्ये तुम्ही योगा, स्ट्रेचिंग, घरात स्थिर सायकल असेल तर सायकलिंग करु शकता.
• कोविडच्या बातम्यांकडे फार लक्ष देऊ नका. कारण या बातम्या कधी कधी खूप क्लेशदायक असतात. त्यामुळे तुम्ही फार चिंताग्रस्त किंवा उदास होऊ शकता.
• पार्किन्सन डिसीज आणि मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटीच्या विविध ऑनलाइन वर्गांमध्ये सहभाग घ्या आणि स्वतःला सक्रिय ठेवा.

(Parkinson Patients Tips during COVID19 corona virus epidemic)

डॉक्टर चारुलता सांखला या पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई मध्ये न्यूरो फिजिशिअन आहेत. त्या पार्किन्सन रुग्णांबरोबर काम करतात. ‘पार्किन्सन डिसीज आणि मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी’च्या त्या उपाध्यक्षा आहेत आणि त्यांनी ‘पार्किन्सन डिसीज आणि सध्या चालू असलेल्या कोविड 19’ बद्दल पार्किंसन्सच्या रुग्णांना हा महत्वाचा संदेश दिला आहे.

‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी (PDMDS)’ ही संस्था बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. भिम सिंघल यांनी 2001 मध्ये स्थापन केली. मुंबईत या घडीला या संस्थेची 20 पेक्षा अधिक आधार केंद्रे कार्यरत आहेत, मुंबई प्रमाणेच PDMDS ची पुणे, नाशिक, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, पंजाब, आसाम, सिक्किम, आंध्रप्रदेश, राजस्थान अशा 13 राज्यात एकूण साठपेक्षा अधिक केंद्रे आहेत. या आधार गटांमध्ये कंपवाताच्या रुग्णांना मोफत शारीरिक, मानसिक, वाचा यावर तज्ञांकडून उपचार दिले जातात.

जागतिक पार्किन्सन दिनाच्या निमित्ताने जगभर विविध संस्था पार्किन्सन्स विषयक कार्यक्रम राबवतात. परंतु COVID-19 च्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे पी.डी.एम.डी.एस.ने आयोजित केलेले या वर्षीचे स्नेह संमेलन आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले, परंतु ‘ऑनलाइन वेबिनार’द्वारे रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी पी.डी.एम.डी.एसने विशेष प्रयत्न केले. ज्यामध्ये पार्किन्सन्सविषयक विविध सत्रे घेण्यात आली. डॉ. भिम सिंघल, डॉ. पंकज आगरवाल, डॉ. चारुलता सांखला, डॉ. पेटरस्प वाडिया, डॉ. जिम्मी लालकाका, डॉ. कठपाल यांसारख्या भारतातील विख्यात न्यूरोलॉजिस्ट तसेच डॉ. उर्वशी शहा, डॉ. मरिया बरेटो, डॉ. राजवी मेहता यांसारख्या पार्किन्सन्स विषयक तज्ज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला. पार्किन्सन्सची लक्षणे, उपचार, योगा, शस्त्रक्रिया अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आणि रुग्णांबरोबर संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. याबरोबरच पार्किन्सन्सच्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पार्किन्सन डिसीज आणि मूव्हमेंट डिसॉर्डर सोसाटी या काळामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंपवाताच्या रुग्णांना मोफत पुनर्वसन उपचार पद्धती आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देत आहे, त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 9987 216057
संकेतस्थळ: www.parkinsonssocietyindia.com
ईमेल: pdmds.india@gmail.com

या वर्षी जरी प्रत्यक्ष भेटून ‘जागतिक कंपवात दिनाचा’ कार्यक्रम साजरा होऊ शकता नाही तरी पण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पार्किन्सन्सचे रुग्ण, त्यांचे कुटुंबिय, त्यांचे वैद्यकीय सल्लागार त्याचप्रमाणे पी.डी.एम.डी.एस. ची संपूर्ण टीम यांनी हा दिवस तितक्याच ताकदीने साजरा केला आणि परत एकदा ‘Together We Move Better’ म्हणजेच ‘एकत्र येऊन आपण सगळं साध्य शकतो’, हे पी.डी.एम.डी.एस चं ब्रीद वाक्य सिद्ध केलं. प्रत्यक्ष भेटता आलं नसलं तरी आपण सगळे एकत्र आहोत हा विश्वास पुन्हा एकदा रुग्णांना या निमित्ताने मिळाला.