पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात अण्णा हजारेंची आज महत्वपूर्ण साक्ष

| Updated on: Jun 27, 2019 | 11:01 AM

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज साक्ष होणार आहे. मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी साक्षीदार म्हणून ही नोंदवण्यात येणार आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात अण्णा हजारेंची आज महत्वपूर्ण साक्ष
Follow us on

उस्मानाबाद : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज साक्ष होणार आहे. मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी साक्षीदार म्हणून ही नोंदवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या हत्याकांडात अण्णा हजारे यांची साक्ष होत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी बोलविण्यासाठी सीबीआयने कोर्टात अर्ज केला होता. मात्र या हत्याकांडातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांनी, अण्णा हजारे यांची साक्ष आवश्यक नसून कोर्टासमोर त्यांना बोलवून साक्ष घेऊ नये असा अर्ज करीत सीबीआयच्या भूमिकेला विरोध केला होता. डॉ पाटील यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अण्णा हजारे यांची साक्ष होणार आहे .

3 जून 2006 रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पवनराजे हत्याकांडात माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 8 जण संशयित आरोपी आहेत.

आरोपी पारसमल जैनने पवनराजे यांच्या हत्येबरोबरच अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ पद्मसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे यांच्या मार्फत दिली होती, मात्र आपण ती नाकारली असे कबूल केले होते.

कोर्टातील या खळबळजनक खुलाशानंतर अण्णा हजारे यांनी डॉ पाटील यांच्याविरोधात लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्येचा कट आणि सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद केला, त्याचा तपास सुरू आहे. अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीमुळे त्यांची या हत्याकांडात साक्ष महत्वाची मानली जाते.