Lionel Messi : फुटबॉलचा देव वानखेडे स्टेडियममध्ये, लियोनेल मेस्सी याच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन
Lionel Messi Wankhede Stadium Project Mahadeva : फुटबॉल चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून लिओनेल मेस्सी याची प्रतिक्षा होती. मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये एन्ट्री घेताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करण्यात आलं.

अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणारा दिग्गज आणि स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीने भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातातून केली. मेस्सीने कोलकातात आपल्या पुतळ्याचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं. त्यानंतर आता मेस्सी भारत दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मुंबई दौऱ्यावर आहे. मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी स्टेडियममध्ये आणि आसपासच्या परिसरात तोबा गर्दी केली आहे. तसेच स्वागतानंतर लिओनेल मेस्सी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं (Project Mahadeva) उद्घाटन करण्यात आलं आहे.
फुटबॉलचा जादूगार क्रिकेटच्या पंढरीत
मेस्सीची चाहते गेल्या तासाभरापासून वाट पाहत होते. मेस्सीची जवळपास 6 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhde Stadium) एन्ट्री झाली. फुटबॉलचा देव क्रिकेटच्या पंढरीत येताच चाहत्यांनी मेस्सी मेस्सी, असा जयघोष करत स्टेडियम दणाणून सोडला. त्यानंतर मेस्सी आणि टीम इंडियाचा दिग्गज फुटबॉलर सुनील छेत्री यांनी एकमेकांची भेट घेतली. मेस्सी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
वानखेडे मेस्सी, मेस्सीचा जयघोष
Mumbai awaits for Messi Mania 🥰 #MessiInIndia pic.twitter.com/5mILJXa1En
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 14, 2025
मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सी याला सन्मानित केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस मेस्सीला स्मृतीचिन्ह दिलं. तसेच यावेळेस फुटबॉलला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या ‘प्रोजेक्ट महादेवा’चं मेस्सीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलं आहे. मेस्सी आणि फडणवीस यांनी बटन दाबून प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन केलं. त्याआधी मेस्सीने 60 खेळाडूंना स्कॉलरशीप दिली. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंना मेस्सीसोबत फुटबॉलचं प्रशिक्षण मिळालं. तसेच मेस्सीने या खेळाडूंना मार्गदर्शन केलं.
‘प्रोजेक्ट महादेवा’
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलला चालना देण्यासाठी आणि फुटबॉलच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात आलं आहे. या प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या 60 खेळाडूंसाठी ही ऐतिहासिक अशी संधी असणार आहे. यातून उद्याचे खेळाडू घडतील तसेच भारताची फुटबॉलमधील कामगिरी आणखी सुधारेल, असा विश्वास सरकारला आहे.
