
आज त्यांना कदाचित मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, पण शेवटी आज नाहीतर उद्या त्यांना निश्चितपणे कळेल की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने ते रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलतायत, अजून कोणच नेता त्याचं समर्थन करत नाहीये आणि नावपण घेत नाहीये. म्हणून मी त्या दृष्टीकोनातून बोललोय की निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय. ती काही राजकीय टीका नव्हती. त्याकडे कसं पाहावं हे त्यांनी ठरवावं. मी राजकीय टीका मुळीच केली नाही आणि ते राजकीय वक्तव्यसुद्धा नव्हतं. मी फक्त त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, अशी बाजू नितेश राणे यांनी मांडली आहे. तर राणेंच्या कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे, हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“ही निवडणूक आम्ही जनतेसाठी लढवतोय. कोणी काय बोलतंय त्यासाठी आम्हाला 2 तारखेनंतर वेळ द्या, आम्ही त्याची उत्तरं देऊ. आम्हाला आमच्या जनतेची बाजू मांडू द्या. आम्हाला इकडच्या मतदाराला केंद्रबिंदू ठेऊ द्या. वेंगुर्ल्यातील जनतेसाठी काय करतोय हे सांगण्याची संधी द्या, तेवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी कोणाला काय म्हणायचंय त्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे,” असंदेखील नितेश राणे म्हणाले.
मुंबई आणि ठाण्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “वक्त वक्त की बात है,” असं उत्तर त्यांनी दिलं आहे. “येणारे 48 तास हे जनतेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कदाचित केरोसिन घेऊन तेल टाकत फिरायचं असेल तर ती माझी चूक नाही. माझ्यासाठी ही निवडणूक जनतेसाठी, माझ्या मतदारांसाठी लढवतोय,” असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
भाजप नेत्यांकडून मला सातत्याने पक्षात येऊन विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर मिळत होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले उपकार मी आयुष्यात विसरू शकत नाही, त्यामुळे मी त्यांना कधीही सोडणार नाही, असं स्पष्ट मत निलेश राणे यांनी मांडलं होतं.