भाषा शिकण्याच्या अॅपवर ओळख, ‘लॉकडाऊन’मध्ये भारतीय तरुण परदेशी युवतीसोबत लग्नाच्या बेडीत

| Updated on: Apr 16, 2020 | 12:00 PM

रोहतकमध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या निरंजनने मेक्सिकोची रहिवासी असलेल्या 21 वर्षांच्या डॅना झाहोरीशी विवाह केला. (Rohtak resident marries Mexican woman in lockdown)

भाषा शिकण्याच्या अॅपवर ओळख, लॉकडाऊनमध्ये भारतीय तरुण परदेशी युवतीसोबत लग्नाच्या बेडीत
Follow us on

गुरुग्राम : ‘लॉकडाऊन’च्या काळात लग्न सोहळ्यांना परवानगी नसली, तरी हरियाणामध्ये भारतीय तरुण आणि परदेशी युवतीचा छोटेखानी विवाह संपन्न झाला. भाषा शिकण्याच्या अॅपवर ओळख झालेलं हे जोडपं रोहतकमध्ये लग्नाच्या बेडीत अडकलं. (Rohtak resident marries Mexican woman in lockdown)

रोहतकमध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या निरंजनने मेक्सिकोची रहिवासी असलेल्या 21 वर्षांच्या डॅना झाहोरीशी विवाह केला. चार वर्षांपूर्वी निरंजन आणि डॅना यांची गाठ पडली ती परभाषा शिकण्याच्या एका अॅपवर. निरंजनला स्पॅनिश भाषा शिकण्यात रस होता, तर डॅनाला इंग्रजी शिकायची होती.

संबंधित अॅपवर तुम्हाला भाषा शिकण्यासाठी जोडीदार निवडण्याची आवश्यकता असते. निरंजनने स्पॅनिश येणाऱ्या डॅनाला निवडले. हळूहळू दोघं बोलू लागले आणि त्यांन एकमेकांच्या आवडी-निवडी कळू लागल्या. मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं, दोघांनाही कळले नाही.

डॅनाबद्दल तुला सर्वात जास्त काय आवडते, असे विचारले, तेव्हा ‘ती फारच भाबडी आहे’ असं उत्तर निरंजनने दिलं. ‘मी तिच्या पालकांशीही बोललो. 2017 मध्ये तिचे कुटुंबीय भारतात आले. स्वागत आणि पाहुणचार पाहून ते भारावून गेले. त्यांना भारतीय संस्कृतीही आवडली’ असं निरंजन सांगतो.

“साखरपुडा” ही संकल्पना डॅना आणि तिच्या कुटुंबीयांसाठी नवीन होती. मात्र तसं केल्यावर निरंजन तुझ्यासाठी ‘रिझर्व्ह’ राहील, असे सांगताच त्यांनी लगेच कल्पना उचलून धरली.

वेगवेगळ्या टाईम झोनमुळे दोन वर्ष ‘लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप’ सांभाळताना अवघड गेलं, असं निरंजन सांगतो. मेक्सिको आणि भारतीय प्रमाणवेळ यात 13 तासांचे अंतर असल्याने दोघांनाही बोलणे कठीण जायचे, असं तो म्हणतो. (Rohtak resident marries Mexican woman in lockdown)

अखेर तिचे कुटुंब 11 फेब्रुवारीला रोहतकला आले होते. त्यांनी एका आठवड्यानंतर कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला. मात्र 18 मार्चला ठरलेल्या दिवशी एक साक्षीदार आलाच नाही आणि लग्न 23 मार्चपर्यंत पुढे ढकलले गेले. लग्न होण्याच्या एक दिवस अगोदर हरियाणा सरकारने सात जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे लग्न पुन्हा लांबणीवर पडले. अखेर स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिल्यावर 13 एप्रिलला दोघांचे रजिस्टर पद्धतीने लग्न झाले.

‘लोकांच्या म्हणण्याकडे मी लक्ष देत नाही. माझे आई-वडील आणि आजी आजोबा आनंदी आहेत’ असं निरंजन म्हणतो. भारतात काही महिने घालवल्यानंतर दोघांनी मेक्सिकोमध्ये स्थायिक होण्याची योजना आखली आहे.

(Rohtak resident marries Mexican woman in lockdown)