अवयवदान जागृतीसाठी झटणाऱ्या कोमलचे अकाली निधन, उदयनराजेंची चटका लावणारी पोस्ट

| Updated on: Sep 02, 2020 | 4:44 PM

साताऱ्याची कोमल पवार-गोडसे 'दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण' झालेली महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती ठरली होती.

अवयवदान जागृतीसाठी झटणाऱ्या कोमलचे अकाली निधन, उदयनराजेंची चटका लावणारी पोस्ट
Follow us on

मुंबई : अवयवदानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी बजावणाऱ्या साताऱ्याच्या कोमल पवार-गोडसे हिचे आज निधन झाले. कोमलच्या निधनानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शोक व्यक्त केला.”सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी” असे लिहित त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. (Satara Komal Pawar Godse Dies MP Udayanraje Bhonsle shares Facebook Post)

“सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार-गोडसे हिला 2017 मध्ये ‘प्लमोनरी हायपरटेन्शन’ या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले. पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली” अशी माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

कोमल ‘दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण’ झालेली महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती ठरली होती. पण तीन दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला ताबडतोब हैदराबादला शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात राहिली नसल्याची धक्कादायक बातमी समजली, असेही उदयनराजे यांनी लिहिले आहे.

“कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी “कोमल न्यू लाईफ फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली होती. त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी खूप मोठं काम केलं. तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली” असेही उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

“स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमलला “सातारा” नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणीप्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली” अशा भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

(Satara Komal Pawar Godse Dies MP Udayanraje Bhonsle shares Facebook Post)