संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू, नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांचा निर्णय

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंधी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Section 144 in Maharashtra).

संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू, नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांचा निर्णय
चेतन पाटील

|

Mar 22, 2020 | 3:41 PM

मुंबई  : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंधी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (Section 144 in Maharashtra). उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिगद्वारे याबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऐतिहासिक आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत (Section 144 in Maharashtra).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम नाईलाजाने लावत आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू. जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

“उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेनेपार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“सरकारी कर्मचारी संख्या २५ वरुन ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहे. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरं, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जनता कर्फ्यूचा निर्णय घ्यावा लागत आहे. हा संयम आपल्याला उद्या सकाळपर्यंत ठेवायचा आहे. कृपया नऊ वाजेनंतर घराबाहेर पडू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें