शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. | Sharad Pawar Marathwada

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी

तुळजापूर: अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत. राज्य सरकारने जास्तीत जास्त कर्ज काढावे, असेही पवार यांनी म्हटले. (Sharad Pawar Marathwada visit in rain affected areas)

उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर सोमवारी ते तुळजापुरात प्रसारमध्यमांशी बोलत होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीची टक्केवारी जास्त आहे. यामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि सोलापूरमधील काही परिसराचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही वर्षात नगदी पिकाची जागा सोयाबीनने घेतली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन कुजला किंवा उद्ध्वस्त झाला आहे. तर काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी ऊसाची लागवडही केली होती. हा ऊसदेखील अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. या भागातील कारखानदारी लवकर सुरु झाल्यास हा ऊस गाळीपासाठी लवकरात लवकर नेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

याशिवाय, अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने हे पाणी शेतीत शिरले. त्यामुळे या भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पीक गेल्यास त्याचा फटका एका वर्षासाठी असतो. मात्र, शेतजमीनच उद्ध्वस्त झाल्यास त्यामधून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना बराच कालावधी लागतो, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच अतिवृष्टीमुळे बांध बंदिस्तीचे नुकसान झालेय. नदीकाठी असलेल्या विहीरीवरील मोटारी वाहून गेल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळाली दिली पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

‘उद्धव ठाकरे आमच्या सांगण्यावरूनच मुंबईत थांबलेत’ संकटाच्या काळात एखाद्या व्यक्तीने एकाच ठिकाणी थांबून प्रशासकीय निर्णय घेणे गरजेचे आहेत. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत थांबण्यास सांगितले आहे. मुंबईत सर्व कार्यालयचे असल्याने या निर्णयप्रक्रिया वेगाने पार पडेल. मला स्वस्थ बसवत नसल्यामुळे मी दौऱ्यावर आला आहे. गेल्या 53 वर्षात लोकांनी मला एकदाही घरी बसवले नाही. त्यामुळे संकटाच्या काळात या लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Marathwada Rain | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(Sharad Pawar Marathwada visit in rain affected areas)

Published On - 9:06 am, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI