बिहारमध्ये कोरोना संपला का?; राऊतांचा भाजपला सवाल

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीकास्त्र सोडलं. बिहारमध्ये कोरोना संपला का? असा सवाल करतानाच लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना बोटावर शाई लावण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं.

बिहारमध्ये कोरोना संपला का?; राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये करोना संपला का?, असा सवाल करतानाच बिहारमध्ये करोना संपला असेल तर केंद्र सरकारने तसं जाहीर करावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. (sanjay raut reaction on bihar election)

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीकास्त्र सोडलं. बिहारमध्ये कोरोना संपला का? असा सवाल करतानाच लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना बोटावर शाई लावण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती आहे. लालूप्रसाद यादव तुरुंगात असले तरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यांमध्ये आणि देशांत कोरोनाच्या भीतीने अधिवेशन होत नाही. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्याने संसदेचं अधिवेशन गुंडाळलं. मग विधानसभा निवडणूक का घेतली जात आहे? एकदाचं कोरोना नावाचं प्रकरण संपवून टाकलं असं जाहीर करा, असंही त्यांनी सांगितलं.

लोकशाहीची बूज राखली गेली पाहिजे. निवडणुका घेण्यासाठी परिस्थिती योग्य आहे की नाही? याचा विचारही केला जायला हवा होता, असं ते म्हणाले. बिहार निवडणुकीत कृषी आणि कामगार विधेयकाचा काहीही परिणाम होणार नसल्याचं सागंतानाच बिहारमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावरच मतदान होतं. तिथे क्वचितच गरिबी हा मुद्दा चालतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बिहारमधील जनतेच्या मनात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात राग आहे. मात्र तिथे विरोधी पक्ष किती सक्षम आहे, यावर सर्व अवलंबून आहे, असं ही ते म्हणाले.

सुशांतप्रकरणाचं नाट्य आधीच ठरलं होतं

बिहार निवडणुकीत सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा मुद्दा राहणार आहे. जेडीयूने तर निवडणुकीसाठी सुशांतची पोस्टरही छापली आहेत. सुशांतसिंह आत्महत्येचा मुद्दा निवडणूक प्रचारात असावा म्हणून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं गेलं. जोर जबरदस्ती आणि धाकदपटशा करून हे मुद्दे प्रचारात आणले गेले. तिथल्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदा ओढण्याचं काम केलं. आता ते बक्सरमधून निवडणूक लढणार आहेत. हे नाट्य आधीच ठरलं होतं. त्यानुसार सगळं चाललं आहे, असा दावा त्यांनी केला.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं?

सुशांत प्रकरणाचा तपास पुढे जाईल असं वाटत नाही. कारण आता सीबीआय कुठेच दिसत नाही. मारूती कांबळेचं काय झालं? असा सवाल ‘सिंहासन’ या मराठी सिनेमातून विचारला गेला होता. तसंच आता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागेल, असं ते म्हणाले. (sanjay raut on bihar election)

एनसीबीचं काम देशात येणाऱ्या अंमली पदार्थांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं आहे. सीमेवरून येणारे ड्रग्स रोखण्यासाठी ते आहेत. पण सध्या एकेका व्यक्तीला बोलावलं जात आहे. त्यांच्या अधिकारात ते तपास करत असतील. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, असंही ते म्हणाले. फिल्मसिटी उत्तर प्रदेशात गेल्याने मुंबईचं वलय अजिबात कमी होणार नाही. आजही बॉलिवूड कलाकार देशात आणि परदेशात चित्रीकरणासाठी जात असतात. पण त्याने मुंबईचं महत्त्व कमी झालेलं नाही. मुंबईतील कितीही कार्यालये हलवले तरी मुंबई झळाळणारच, असंह त्यांनी स्पष्ट केलं.

कंगनाने कोर्टात खेचल्याप्रकरणीही त्यांनी भूमिका मांडली. कंगनाप्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. तरीही कोर्टात भूमिका मांडणार. पालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी तिच्या कार्यालयावर कारवाई केली. त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, असंही ते म्हणाले.

बिहार निवडणूक लढवयाची की नाही? दोन दिवसात निर्णय

बिहार निवडणूक लढवण्याबाबत शिवसेनेने अजून भूमिका घेतलेली नाही. पण पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसात शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल, असं त्यांनी शेवटी सांगितलं.

संबंधित बातम्या:

बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडेंनी सुशांत प्रकरणात राजकारण केलं : संजय राऊत

… तर तुरुंगात जायलाही तयार आहे, संजय राऊतांचा इशारा

धारावीत कोरोना नियंत्रणात आणला – संजय राऊत

(sanjay raut on bihar election)

Published On - 3:29 pm, Fri, 25 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI