शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबाबत शरद पवारांचं भुवया उंचावणारं विधान

| Updated on: Nov 18, 2019 | 12:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Maharashtra Government Formation) राज्यातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत आल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबाबत शरद पवारांचं भुवया उंचावणारं विधान
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Maharashtra Government Formation) राज्यातील सत्तास्थापनेबाबत काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत आल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते देखील शरद पवार सोनिया गांधीशी बोलून सत्तास्थापनेवर पुढील निर्णय घेतील, असं सांगत आहेत. मात्र, शरद पवारांनी (Sharad Pawar on Maharashtra Government Formation) आपली ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक भुवया उंचावणारी विधानं केली आहेत.

शरद पवार म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीची युती स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी आश्चर्य वाटल्यासारखा उपरोधात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत सरकार बनवणार का यावर त्यांनी शिवसेनेला विचारा असंही म्हटलं.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी यावर बोलताना माध्यमांनी बोलण्याचा आग्रह केल्यामुळे शरद पवार यांनी याप्रकारे प्रतिक्रिया दिली असावी, असं मत व्यक्त केलं. तर दुसरीकडे अशोक वानखेडे यांनी शरद पवार हे अनुभवी राजकारणी असल्याचं म्हणत ते चिडून बोलले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सत्तास्थापनेतील गोंधळातून पवारांचं हे विधान आल्याचंही वानखेडे यांनी नमूद केलं.

शरद पवार आणि पत्रकारांमधील नेमका संवाद काय?

प्रश्न – सरकार स्थापनेला चर्चेमुळे उशीर होतोय?
पवार – कुणाची चर्चा? कुणासोबत चर्चा?

प्रश्न – सरकार स्थापनेविषयी आज औपचारिक घोषणा होणार का?
उत्तर – नाही नाही, ही केवळ आमची सदिच्छ भेट आहे.

प्रश्न – शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होईल असं बोललं जात आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन होईल असं वाटतंय?
पवार – शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले, काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले! तुम्ही असं कसं म्हणू शकतात. त्यांना त्यांचा रस्ता निवडायचा आहे. आम्ही आमचं राजकारण करत आहोत.

प्रश्न – शिवसेना तर म्हणतेय पवारांसोबत सरकार बनवू?
उत्तर – अच्छा? (आश्चर्याच्या मुद्रेसह)

प्रश्न – सोनिया गांधींना भेटणार का ?
उत्तर – हो… संध्याकाळी, सदिच्छा भेट आहे.

प्रश्न – महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल?
उत्तर – नाही, ते तेथे नेत्यांना विचारावं लागेल.