शेतकऱ्याने सावकारासमोरच विष प्यायलं, सावकाराने मदतीऐवजी व्हिडीओ शूट केला

या सर्व प्रकारात पीडित शेतकऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदाम फपाळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकऱ्याने सावकारासमोरच विष प्यायलं, सावकाराने मदतीऐवजी व्हिडीओ शूट केला

बीड : बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन परत देण्यास सावकाराने नकार दिला. या सावकारासमोरच शेतकऱ्याने विषप्राशन केलं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हा सावकार या क्षणाचा आनंद घेत होता. त्याने सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या सर्व प्रकारात पीडित शेतकऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुदाम फपाळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

या शेतकऱ्याने बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने खाजगी सावकार विलास फफाळ याच्याकडून दोन लाख रुपये कर्ज घेतलं. त्याबदल्यात पावणे चार एकर शेती सावकाराकडे गहाण देखील ठेवली. या शेतकऱ्याने दोन लाख रुपयांची तब्बल पाच लाख रुपये सावकाराची परतफेड केली. शेती परत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र या सावकाराची नियत फिरली आणि शेतीवर कब्जा केला. निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबासमोर आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय.

वडिलोपार्जित हक्काची जमीन डोळ्यासमोर सावकार आणि त्याचे गुंड नांगरत असताना या शेतकऱ्याला पाहावलं नाही. हतबल झालेल्या शेतकऱ्याने सावकारासमोरच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र बाजूला असलेल्या सावकाराच्या गुंडांना थोडीही त्याची दया आली नाही. त्याला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. उलट या नतद्रष्टांनी या सर्व प्रकारचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केलाय. हा प्रकार एक तास चालू होता.

घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा या शेतकऱ्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं. वेळेत आणि व्याजासकट सावकाराचे पैसे देऊनही सावकार मानसिक जाच करत होता. अनेक वेळा या शेतकऱ्याला मारहाण देखील करण्यात आली. पोलिसात तक्रार देखील करण्यात आली. मात्र या सावकाराची दहशत एवढी मोठी आहे की पुढे कारवाई झालीच नाही. आता मुलाने विष प्राशन केले त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍यापुढे एक दुसरं नवं संकट उभं राहिलंय. आता या सावकारावर कारवाई करावी अशी मागणी पीडित शेतकरी कुटुंब करत आहे.

याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात जवाब दाखल करून घेण्यात आला आहे. शेतकऱ्याला विष पाजले की शेतकऱ्याने ते विष प्राशन केले याचा तपास आता पोलीस करत आहेत. यात सावकार दोषी असतील तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकारी सांगतात. आरोप झालेल्या हनुमंत फपाळ आणि विलास फपाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते बाहेर आहेत असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही. सावकार आणि शेतकरी हे समीकरण जिल्ह्यासाठी नवीन नाही. मात्र मजबूर आणि हतबल असलेल्या गरीब शेतकऱ्यांचे शोषण करून घेणाऱ्या सावकारावर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI