
मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उष्णता भयंकर वाढली आहे. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करण्यासाठी प्रवासी प्राधान्य देत आहेत. अशावेळी विनातिकीट एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा आणि गर्दीचा सामना करावा लागत आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एसी लोकल आणि साध्या लोकलच्या फर्स्टक्लासने प्रवास करताना विनातिकीट किंवा साधे तिकीट असतानाही घुसखोरी करुन गर्दी करणाऱ्या प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर सध्या दररोज 33 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. तसेच दररोज 1810 लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत. मध्य रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालविल्या जात आहेत. सध्या उन्हाळ्याचा तडाका मोठा आहे. त्यामुळे एसी लोकलला मागणी वाढली आहे. एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे तिकीट दर गेल्यावर्षी निम्याने कमी केले होते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या 66 एसी लोकल फेऱ्यातून दररोज साधारण 78,323 प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाक्यात एसी लोकलला प्रवासी प्राधान्य देत आहेत. यातील सर्वाधिक एसी लोकलच्या फेऱ्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर चालविण्यात येत आहेत. एसी लोकलमधून सुरक्षित आणि वेळेत प्रवास करता येत आहे.परंतू एसी लोकलमधून काही विनातिकीट प्रवासी घसुखोरी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्स नियमित तिकीट तपासणी बरोबरच आता आणखी एक निर्णय घेतला आहे.
एसी लोकल किंवा साध्या लोकलच्या फर्स्टक्लासच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जरब बसण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्सने नवीन व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 जारी केला आहे. या हेल्पलाईनवर जर प्रवाशांना प्रवासात काही अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्या तर त्यांची तक्रार करण्याची सोय आहे. या व्हॉट्सॲप तक्रार क्रमांकांवर केवळ मॅसेज करण्याची सोय आहे. प्रवाशांच्या या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेने खास स्पेशल मॉनिटरींग टीमची स्थापना केली आहे. या क्रमांकावर तक्रार करताच ही टीम कारवाई करणार आहे. जर लागलीच तक्रारीचे निवारण केले नाही तर ही टीम दुसऱ्या दिवशी डब्यात साध्या वेशात पाळत ठेवून कारवाई करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.