दारोडावासियांच्या दगडफेकीतही धीराने रुग्णवाहिका चालवली, चालकाचा पोलिसांकडून गौरव

जमावाची दगडफेक आणि पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज अशा तणावपूर्ण वातावरणात चालकाने निर्भयतेने रुग्णवाहिका पीडितेच्या घरांपर्यंत नेली.

दारोडावासियांच्या दगडफेकीतही धीराने रुग्णवाहिका चालवली, चालकाचा पोलिसांकडून गौरव

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. दारोडा गावातील नागरिकांचाही उद्रेक झाला असून संतप्त जमावाने जोरदार दगडफेक केली. याच दगडफेकीत पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाने मात्र, प्रसंगावधान दाखवलं. जमावाची दगडफेक आणि पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज अशा तणावपूर्ण वातावरणात चालकाने निर्भयतेने रुग्णवाहिका पीडितेच्या घरांपर्यंत नेली. समोर इतकी स्फोटक परिस्थिती असतानाही चालकाने दाखवलेल्या धाडसाबद्दल पोलीस प्रशासनाने त्याचा पत्नीसह सत्कार केला (Wardha Police honor Ambulance driver).

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर वर्ध्यातील वातावरण चांगलंच स्फोटक झालं. नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर हा तणाव चांगलाच वाढला. अशास्थितीतही रुग्णवाहिका चालक आणि मालक जयपाल वंजारी यांनी धाडस दाखवलं. त्यांनी पीडितेचा मृतदेह नागपूर येथील रुग्णालयातून घरापर्यंत पोहचवण्याचं काम स्वीकारलं. बुटीबोरी, हिंगणघाटनंतर रुग्णवाहिका दारोडा येथे पोहचल्यावर संतप्त दारोडावासीयांनी महामार्ग रोखून धरला. तसेच रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देण्यास नकार दिला. यावेळी पीडितेला न्याय देण्याच्या जोरदार घोषणा होत होत्या. अशातच अचनाक दगडफेक सुरु झाली.

जोरदार दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देत लाठीचार्ज केला. अशा स्फोटक स्थितीत चालकाने धाडस करत रुग्णवाहिका पीडितेच्या घराजवळ पोहचवली. विशेष म्हणजे दगडफेक आणि लाठीचार्जचा हा सर्वप्रकार रुग्णवाहिका चालकाचं कुटुंब टीव्हीवर लाईव्ह पाहत होतं. चालकाची पत्नी वैशाली जयपाल वंजारी प्रचंड भीतीच्या वातावरणात होत्या. जयपाल वंजारी यांना 7 वर्षांची मुलगी आहे. तिने देखील हा सर्व थरार टीव्हीवर बघितला. यावेळी चालक जयपाल वंजारी यांचं कुटुंब त्यांच्या सुखरुप परतण्याचीच मनोकामना करत होतं.

वडील घरी पोहचणार आणि त्यांची भेट घेणार अशी आशा लावून बसलेल्या मुलीला रात्रभर वडिलांची भेट घेता आली नाही. मुलीचं वडिलांच्या रुग्णवाहिकेवर विशेष प्रेम होतं. तोडफोड झालेल्या अवस्थेतील गाडी मुलगी पाहू शकणार नाही आणि तिला याचं जास्त दुःख होईल म्हणून वडिल जयपाल वंजारी यांनी नाईलाजाने रात्र बाहेरच काढली.

अत्यंत संवेदनशील प्रकरणात धाडसाने वाहन चालवत आपल्या जीवाची पर्वा न करता जयपाल यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यांच्या या धाडसाबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे देखील उपस्थित होते. कर्तव्यात कोणतीही कसूर न करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकाच्या धाडसाला टीव्ही 9 मराठीचा सलाम.

Wardha Police honor Ambulance driver

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI